पुणे : राज्याचं नव्हे, तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा निवडणुकीत काका विरुद्ध पुतणे अशी लढत होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षानं युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्यानं बारामतीत काका विरुद्ध पुतणे अशी लढत होत आहे. दोन्ही पवारांकडून बारामती विधानसभा मतदार संघात प्रचार करत सभा घेत आपली भूमिका मांडण्यात येत आहे.
प्रतिभा पवार यांना रोखलं : शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या पक्षाकडून बारामतीत घरोघरी जात जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच आज (17 नोव्हेंबर) शरद पवार यांची पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं होतं, असा दावा खुद्द प्रतिभा पवार यांनी एक व्हिडिओ शूट करत केला. "आम्हाला खरेदी करण्यासाठी आतमध्ये जायचं आहे. त्यामुळं तुम्हीआम्हाला आतमध्ये सोडा," अशी विनंती त्यांनी तेथील सेक्युरिटी गार्डला केली होती. मात्र, गेट बंद करुन आतमध्ये कोणालाही सोडू नये, असे आदेश वरिष्ठांनी दिले असल्याचं त्या गार्डनं प्रतिभा पवार यांना सांगितलं.
प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं (Source - Pratibha Pawar) अर्धा तास गेटवर थांबवलं : तब्बल अर्धा तास प्रतिभा पवार व नात रेवती सुळे यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं होतं, असा आरोप प्रतिभा पवार यांनी केला. याबाबतचा एक व्हिडिओ खुद्द प्रतिभा पवार यांनी शूट केला. दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळं या प्रकरणावरुन राजकारण आणखी तापलंय.
बारामतीत प्रचाराचा धुराळा : बारामतीत सध्या विधानसभा निवडणुकीवरुन वातावरण तापलं आहे. येथे पवार कुटुंबातीलच दोन उमेदवार आमनेसामने आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राज्यात प्रथमच विधानसभेची निवडणूक होत आहे. फुटीनंतर लोकसभेची निवडणूक झाली होती. यात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. आता विधानसभेला पवार कुटुंबातील काका-पुतण्याच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा
- बाळासाहेब ठाकरेंचा 12 वा स्मृतीदिन; शिवतिर्थावर उद्धव ठाकरेंकडून अभिवादन, राहुल गांधी म्हणाले...
- "बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेता अन् त्यांच्याच...", प्रियंका गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
- नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकून मारण्याचा प्रयत्न, सभेतील राड्यानंतर २५ जणांवर गुन्हा दाखल