मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉन रविवारी (19 जाने.) अत्यंत उत्साहात पार पडली. ही मॅरेथॉन आशिया खंडातील सर्वात नावाजलेल्या स्पर्धांपैकी एक मानली जाते. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे यात आबाल वृद्धांपासून ते दिव्यांगांपर्यंत सर्वचजण सहभागी होतात. देश विदेशातील अनेक खेळाडूदेखील या स्पर्धेत सहभागी होतात. यंदा या स्पर्धेत सैन्यदलात युद्ध सराव करताना किंवा युद्धादरम्यान अपंगत्व आलेल्या जवानांनीदेखील सहभाग घेतला.
निवृत्त लेफ्टनंट जनरल काय म्हणाले? : सैन्य दलात काम करताना काही कारणामुळं अपंगत्व आलेल्या जवानांसाठी काम करणारी एक संस्था आहे. वॉर वॉन्डड फाउंडेशन (War Wounded Foundation) असं या संस्थेचं नाव आहे. सैन्य दलातील निवृत्त अधिकाऱ्यांनी ही संस्था सुरू केलीय. सैन्य दलात लेफ्टनंट जनरल या पदावरुन निवृत्त झालेल्या आशित मिस्त्री यांनी या संस्थेची स्थापना केली. मिस्त्री हे सध्या या संस्थेचे अध्यक्ष असून 'ईटीव्ही भारत'शी बोलताना त्यांनी सांगितलं की, "सामान्य नागरिकांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. पण, सैन्य दलात अपंगत्व येणाऱ्या जवानांसाठी काम करणाऱ्या फार कमी संस्था आहेत. त्यामुळंच आम्ही या संस्थेची सुरुवात केलीय. ही संस्था सैन्यदलात युद्ध सरावादरम्यान, प्रत्यक्ष युद्धादरम्यान अथवा एखाद्या अपघातात एखाद्या जवानाला अपंगत्व आलं तर त्यांच्यासाठी काम करते."
शारीरिक अपंगत्वापेक्षा मानसिक अपंगत्व गंभीर : पुढं ते म्हणाले, "सैन्य दलामध्ये भरती होणं किती अवघड आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. तेथील कठीण ट्रेनिंग, खडतर जीवन हे सर्व आम्ही अनुभवलंय. पण, जेव्हा एखाद्या जवानाला अपंगत्व येतं, तेव्हा ती लढाई फार मोठी असते. त्याची तुलना आपण सीमेवरील लढाईशी करू शकत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शारीरिक अपंगत्व एखादा जवान जिंकू शकतो. पण, तो जवान जेव्हा मनानं खचतो तेव्हा त्याला आलेलं मानसिक अपंगत्व फार गंभीर असतं. यात केवळ तो जवानच सर्व काही सोसत असतो असं नाही. तर त्याचे कुटुंबीयदेखील या सर्वातून जात असतात."
आशित मिस्त्री यांनी सर्वांना मदतीचं आवाहन केलंय. जनतेनंदेखील या जवानांसाठी पुढं येऊन शक्य होईल तशी मदत करायला हवी, असं ते म्हणालेत. दरम्यान, निवृत्त लेफ्टनंट जनरल आशित मिस्त्री यांना त्यांच्या सैन्यदलातील सेवेसाठी विविध पदकांनी गौरवण्यात आलंय. त्यांना परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल, सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल, अशा पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.
हेही वाचा -