सातारा- खासगी सावकार अनेकदा व्याजाची वसुली करताना ग्राहकांची पिळणूक करतात. अशा सावकारांना पोलिसांनी चांगलेच वठणीवर आणलं आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सावकारीच्या दोन गुन्ह्यांत अर्थिक गुन्हे शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेने सावकारांकडून १ कोटी १७ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. याप्रकरणी दोन सराफांनादेखील नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक आश्लेषा फुले यांनी या कारवाईची माहिती दिली.
अव्वाच्या सव्वा व्याज घेणाऱ्या दोन सावकारांना पोलिसांकडून दणका, १ कोटी १७ लाखांचे दागिने जप्त - SATARA CRIME NEWS
आर्थिक गुन्हे शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेनं खासगी सावकारीच्या दोन गुन्ह्यांत मोठी कारवाई केली आहे. खासगी सावकारांनी तारण घेतलेले १४६ तोळ्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
Published : Dec 6, 2024, 7:34 AM IST
खासगी सावकारांकडून अव्वाच्या सव्वा वसुली-सातारा शहर पोलीस ठाण्यात विजय वसंतराव चौधरी, कल्पना विजय चौधरी आणि अजिंक्य अनिल चौधरी या खासगी सावकारांच्या विरोधात गुन्हे दाखल आहे. तक्रारदार मनोज गणपती महापरळे यांनी संशयितांकडून १ कोटी ९२ लाख रुपये अडीच टक्के व्याजानं आणि नंतर १० टक्के व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात तक्रारदारानं ६५ तोळ्याचे दागिने आणि ५० लाख रुपये किमतीचा प्लॉट तारण दिला होता. मुद्दल १ कोटी ९२ लाख आणि त्यावर १ कोटी १२ लाख ७७ हजार रूपये, असे एकूण ३ कोटी ४ लाख ७७ हजार रुपये देऊनही सावकारांनी दागिने आणि प्लॉट परत दिला नाही. म्हणून तक्रारदारानं सावकाराविरोधात विरोधात दिली होती.
दोन सावकारांवर दाखल होते गुन्हे-सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यातील तक्रादार शकुंतला अशोक शिंदे (मयत) यांनी १९ लाख ९८ हजार रुपये अडीच टक्के व्याजानं घेतले होते. त्यासाठी ८१ तोळ्यांचे दागिने गहाण ठेवले होते. तक्रादारानं २० लाख ४८ हजार ९३१ रुपये परत देऊनही सावकारांनी गहाण ठेवलेले दागिने परत दिले नाहीत. म्हणून महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
दोन सराफांनाही बजावली नोटीस - सावकारीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक आश्लेषा फुले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या पथकाच्या मदतीनं तपास केला. संशयितांविरोधात सबळ पुरावा गोळा करून दोन्ही गुन्ह्यातील सावकारांकडून १४६ तोळ्याचे दागिने हस्तगत केले. तसेच दोन सराफांनाही नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा-