छत्रपती संभाजीनगर Sanjay Shirsat News : लोकसभा निवडणुकीत राज्यात काही धक्कादायक निकाल लागले. मात्र यात अनेकांचा तोटा झाला असला तरी काही ठिकाणी विजयी उमेदवारांमुळे काही जणांची लॉटरी लागली. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगर इथं घडला. पालकमंत्री संदीपान भुमरे लोकसभा निवडणूक जिंकल्यानं संजय शिरसाट यांचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर ठाकरे सेनेवर आमदार संजय शिरसाट यांनी आक्रमकपणे हल्लाबोल केला. त्यांना मंत्रीपद मिळेल, अशी शक्यता असताना संदीपान भुमरे यांना संधी देण्यात आली. मात्र भुमरे खासदार झाल्यानं शेवटचे काही महिने का होईना, संजय शिरसाट यांना एक संधी निर्माण झाली.
संजय सिरसाट यांना मिळणार संधी ? :औरंगाबाद लोकसभा मतदार संघात महायुतीचे संदीपान भुमरे यांनी आश्चर्यकारक विजय मिळवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर, शिवसेनेच्या पारंपरिक जागांवर त्यांनी दावा करत ठाकरे यांच्या गटाच्या विरोधात शिवसेनेनं निवडणूक लढवली. त्यात औरंगाबाद ही जागा प्रतिष्ठेची मानली गेली. जिल्ह्यातील पाच आमदारांनी ठाकरे ऐवजी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यावेळी महत्वाची भूमिका पार पाडली, ती पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांनी. त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळेल, अशी शक्यता होती. मात्र युतीमध्ये तीन मंत्रिपदं जिल्ह्याला मिळाले. त्यात पैठणचे आमदार संदीपान भुमरे, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, पूर्वचे आमदार अतुल सावे यांची वर्णी लागली. या मंत्रिमंडळात मंत्री होण्याची संधी मिळणार नाही, असं वाटत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे खासदार झाल्यानं संजय शिरसाट यांचा मंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालाय. पण याबाबत बोलताना "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, त्यानुसार आम्ही काम करू," असं आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं.