मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नियंत्रण असल्याचा आरोप शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. "शिवसेनेतील २० ते २२ आमदारांवर देवेंद्र फडणवीस यांच पूर्ण नियंत्रण आहे. कारण, ते आमदार मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सांगण्यावरुन सुरतला गेले होते," असं संजय राऊत म्हणाले.
शिंदेंचा पक्ष म्हणजे सरपटणारा प्राणी : "शिंदेंच्या आमदारांची कोंडी होत असून, भविष्यात आणखी कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं पुन्हा परत फिरायचं का?, अशी चर्चा त्या आमदारांमध्ये सुरु झाली आहे," असं संजय राऊत म्हणाले. "अशा परिस्थितीत आपल्याला संरक्षित करणारं नेतृत्व नाही, अशी त्यांची मनस्थिती झाली आहे. त्यामुळं त्या आमदारांमध्ये चलबिचलता वाढली आहे. महाराष्ट्रातील सरकार बहुमतातील असलं तरी ते एकसंघ नाही आणि त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही. एकमेकांविरोधात कुरघोड्या करण्याचे प्रकार सुरु आहेत. एकनाथ शिंदेंची कुरघोडी करण्याची ताकद भाजपानं संपवली आहे. भाजपासमोर शिंदेंचा पक्ष सरपटणारा प्राणी झाला आहे," असा आरोप राऊत यांनी केला.
अर्थसंकल्पावर भाजपाचे अंधभक्त उड्या मारत आहेत : "केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर लोकांनी अत्यानंदानं उड्या माराव्यात, असं काहीही नाही. त्यावर केवळ भाजपाचे अंधभक्त उड्या मारत आहेत. मध्यमवर्गीयांची मतं भाजपाला मिळालेली नाहीत, त्या मध्यमवर्गीयांना मधाचं बोट लावण्याचा प्रकार आहे," अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. बिहारच्या तुलनेत महाराष्ट्राला काय मिळालं? याचा विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रत्येक अर्थसंकल्प निवडणुका लक्षात ठेवून केलेले असतात अशी," टीका त्यांनी केली. "भाजपाकडून राज्यांच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं केली जातात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना अर्थसंकल्प कळलेला नाही. अर्थसंकल्प कळण्यासाठी ७२ तास द्यावे लागतात, ते अर्थतज्ञ आहेत का?," असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.