मुंबई:अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यांना अटक करण्यात मुंबई गुन्हे शाखेला ४८ तासात यश आलं आहे. आरोपींना गुजरामधील भूजमधून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींची चौकशी करण्याकरिता त्यांना आज मुंबईत आणण्यात येणार आहे. हे दोन्ही आरोपी बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
रविवारी पहाटेअभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. दोन हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत अभिनेता सलमान राहत असलेल्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर चार गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांनी दुचाकीवरून पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद झाली.
गोळीबाराचा उद्देश काय होता?अटकेतील दोन्ही आरोपींना आज सकाळी आठ वाजता विमानानं गुजरातवरून मुंबईत आणण्यात येणार आहे. आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी हे विमान मुंबई विमानतळावर दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन्ही आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गॅंगशी संबंध असल्याची माहिती देखील समोर येत आहे.दोन्ही आरोपीनं सलमान खानच्या घराबाहेर गोळ्या झाडण्यामागे नेमका काय उद्देश होता?सलमान खानला जीवे मारण्याचा उद्देश होता का? दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी हे दुष्कृत्य केले आहे का, याबाबत दोन्ही आरोपींची चौकशी केली जाणार आहे.
गुजरात पोलिसांनी काय सांगितलं?-पश्चिम कच्छचे स्थानिक पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. दोन्ही आरोपींना लखपत तालुक्यातील माता का मढ येथून अटक करण्यात आली आहे. आरोपींना मुंबई पोलिसांकडं सुपूर्द करण्यात आलं आहे. पश्चिम कच्छचे पोलीस महासंचालक महेंद्र बागडिया म्हणाले, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी पश्चिम कच्छमध्ये पळून आले होते. पश्चिम कच्छचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे दोन्ही आरोपींना अटक केली. पुढील तपसासाठी आरोपींना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस पुढील चौकशी करणार आहेत. त्यांना विमानानं मुंबईत नेण्यात येणार आहे. कच्छ पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तीन जणांची पोलिसांकडून चौकशी-याबाबत पोलिसांकडून माध्यमांना देण्यात आलेली माहिती अशी की, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे दोन्ही मोटारसायकलस्वार आरोपी नवी मुंबईतील पनवेल भागात सुमारे महिनाभर भाड्याच्या घरात राहत होते. त्याच परिसरात सलमानचे फार्महाऊस आहे. दिवसभरात पोलिसांनी या घटनेसंदर्भात नवी मुंबईतील तीन जणांची चौकशी केली. या चौकशीत घराचा मालक, गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीचा पूर्वीचा मालक, विक्रीसाठी सोय करणारा एजंट आणि इतर अनेकांचा समावेश आहे.