पुणे- सारथी संस्थेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडचा काळ हे स्पर्धेचे युग असून, आमच्या लहानपणी फार मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप होत होता. त्यांना वाटले याला कुठे कामाला लावायचं तर ते त्याला कामाला लावून टाकत होते, अशा पद्धतीने कामाला लागून जायचं, आता मात्र ऍडमिशन देतानासुद्धा मेरिट पाहिलं जातं असल्याचं अजित पवारांनी अधोरेखित केलंय.
शाहू महाराजांच्या विचारांनी संस्थेचा पुढे जाण्याचा प्रयत्न : पुण्यातील सारथी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट दिली, यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. अजित पवार म्हणाले की, यावर्षी महाराष्ट्रातील खूप विद्यार्थी यूपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले पाहिजेत, अशा प्रकारची माझी विनंती आहे. राजश्री शाहू महाराजांच्या विचारांनी अन् प्रेरणांनी ही संस्था पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी त्या काळामध्ये तो आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला होता किंवा तो कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला होता, त्याची आजदेखील समाजाला गरज आहे आणि ही वास्तू आपण सगळ्यांनी उभी केलेली आहे. यामध्ये आमचा हाच प्रयत्न की, उद्याची भावी पिढी अतिशय उत्तम पद्धतीने घडावी, असंही अजित पवारांनी सांगितलंय.
अलीकडचा काळ हे स्पर्धेचे युग : तसेच एक गोष्ट मुला-मुलींनो लक्षात ठेवा, अलीकडचा काळ हे स्पर्धेचे युग आहे. आम्ही ज्यावेळेस लहान होतो, तेव्हा फार मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप होत होता आणि एखाद्याला कुठेही कामाला लावायचं तर ते याला कामाला लावून टाका, अशा पद्धतीने कामाला लागून जायचं. आता मात्र ऍडमिशन देताना पण मेरिट पाहिलं जातं होतं. अलीकडे श्रीमंतीला महत्त्व नाही, बुद्धिमत्तेला महत्त्व आहे. ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, तो जगामध्ये कितीही पुढे जाऊ शकतो, किती चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी त्याला पाहिजे, तशा पद्धतीने मिळू शकतात ही वस्तुस्थिती आहे, असंही यावेळी अजित पवार म्हणालेत.
विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांच्या फार अपेक्षा : ते पुढे म्हणाले की, विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या बाबतीमध्ये आई-वडिलांच्या फार अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडून आहेत आणि तुम्हाला घडवण्याचा, तुम्हाला वाढवण्याचा, तुमच्यावर संस्कार करण्याचं काम तुमच्या जन्मापासून आजपर्यंत आई-वडील करीत आलेले आहेत. घरातले वडिलधारी करत आलेले आहेत, पुढच्याही काळामध्ये त्या महत्त्वाच्या परीक्षेला बसत असताना हे विचार डोळ्यांसमोर ठेवा आणि नवीन खूप काही रोज शिकता येते, तरी शिकण्यासाठी प्रयत्न करा आणि जे प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे, ते व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि हा प्रयत्न ज्यावेळेस आपण कराल, त्यावेळेस उद्याची जबाबदार नागरिकदेखील तुम्ही घडणार आहात ही पण गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही, असं मार्गदर्शन यावेळी अजित पवारांनी विद्यार्थ्यांना केलंय.
हेही वाचा -