Best Foods For Healthy Brain: म्हातारपणी स्मरणशक्ती कमी होते हे सर्वांना माहिती आहे. परंतु पोषण आहाराच्या कमतरतेमुळे तरुणपणात देखील विसरण्याच्या सवयीचा त्रास होवू लागला आहे. कामाचा ताणतणाव, मल्टी टास्किंग आणि अतिरिक्त स्किन टाईम, बदलती जीवनशैली, अस्वास्थकर आहारामुळे अनेकांची स्मरणशक्ती कमजोर होऊ लागली आहे. परिणामी कमी वयातच शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना अनेकांना करावा लागत आहे. यामुळे मेंदूच कार्य सुधारण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या पोषक तत्वांनी समृद्ध अन्न खाणे महत्वाचे आहे. यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते.
- पालेभाज्या: पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, फोलेट, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. २०१५ मध्ये द जर्नल्स ऑफ जेरोन्टोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की हे घटक मेंदूतील न्यूरॉन्स मजबूत करतात आणि मेंदूच आरोग्य सुधारतात. यामुळे तुम्ही तुमच्या आहारात पालक, केळं आणि ब्रोकोली सारख्या पालेभाज्यांचा नियमितपणे समावेश करा.
- बेरी: बेरी खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य राखण्यास मदत होते. विशेषतः ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्स भरपूर प्रमाणात आढळतात. जे मेंदूचं कार्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. तसंच यात असलेले फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स मेंदूच कार्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
- हळद: हळदीमध्ये कर्क्युमिन भरपूर प्रमाणात असते, जे शक्तिशाली दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असलेले संयुग आहे. विविध अभ्यासांनुसार हे स्मरणशक्ती सुधारण्यास आणि अल्झायमर सारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांचा धोका कमी करण्यास मदत करू शकते, असे समोर आले आहे. द अमेरिकन जर्नल ऑफ जेरियाट्रिक सायकियाट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे सूचित करण्यात आलं आहे की, वृद्धांमध्ये स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यासाठी हळद फायदेशीर ठरू शकते.
- अक्रोड: अक्रोडमध्ये निरोगी चरबी, व्हिटॅमिन ई आणि पॉलीफेनॉल भरपूर प्रमाणात असतात. द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमधील एक अभ्यासात असं आढळून आलं की, हे घटक मेंदूच्या आरोग्यास समर्थन देते. तसंच हे मेंदूच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवण्यास देखील मदत करू शकते. विशेषत: वृद्धांमध्ये संज्ञानात्मक कार्य आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी अक्रोडाचे जास्त सेवन फायदेशीर ठरू शकते.
- डार्क चॉकलेट: डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट्स पुरेशा प्रमाणात आढळतात. यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत होण्यासा मदत होते. २०१४ मध्ये नेचर न्यूरोसायन्समध्ये झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की ते स्मरणशक्ती सुधारण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते.
- ऑलिव्ह ऑइल: ऑलिव्ह ऑइलमध्ये पॉलिफेनॉल अँटीऑक्सिडंट्स आणि फायदेशीर मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते. हे मेंदूचे आरोग्य राखण्यास खूप मदत करते. ऑलिव्ह ऑइल मेंदूतील जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करू शकते आणि न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांपासून संरक्षण करू शकते.
- एवोकॅडो: एवोकॅडो हा मोनोअनसॅच्युरेटेड फॅटचा समृद्ध स्रोत आहे. मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी हे फायदेशीर आहे. एवोकॅडो मेंदूमध्ये रक्त प्रवाह सुधारण्यास आणि संज्ञानात्मक कार्यास समर्थन देण्यास मदत करू शकते. २०१७ मध्ये फ्रंटियर्स इन एजिंग न्यूरोसायन्स मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं की, एवोकॅडो स्मरणशक्ती सुधारण्यासाठी देखील प्रभावी आहे.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)