मुंबई- राज्यातील विविध भागातून आणि गाव-खेड्यातून लोक मंत्रालयात कामासाठी येतात. पण मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. मंत्रालयात होणारी गर्दी आणि सुरक्षा यंत्रणावर येणारा ताण पाहता काही दिवसांपूर्वी मंत्रालयात 'एफआरएस' (फेशियल रिकॉग्निनेशन सिस्टीम) प्रणाली बसवण्यात आलीय. तुमचा चेहरा स्कॅन झाल्यानंतरच आणि ओळख सुनिश्चित झाल्यानंतर मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. मात्र 'एफआरएस' या प्रणालीमुळे सामान्यांना मंत्रालयात जसा प्रवेशासाठी त्रास होतोय, तसा आमदारांच्या पीएनाही प्रवेशासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय.
तात्पुरते तरी ओळखपत्र मिळावे : दरम्यान, आमदारांची अनेक शासकीय कामं ही मंत्रालयात होत असतात. पण आम्ही मंत्रालयाच्या गेटवर आलो की, आम्हाला प्रवेश नाकारला जातो. कारण एफआरएस प्रणालीमुळे आम्हाला प्रवेश देण्यात येत नाही. त्यामुळे आमची अनेक कामं होत नाहीत. जसं सामान्यांना मंत्रालयात प्रवेशासाठी त्रास होतोय, तसाच आम्हालाही मंत्रालयात प्रवेश मिळवताना संघर्ष करावा लागतोय, अशी प्रतिक्रिया आमदारांच्या स्वीय सहाय्यकांनी दिलीय. याबाबत सरकारने आमदारांच्या पीएना मंत्रालयात प्रवेशासाठी तात्पुरते ओळखपत्र द्यावे किंवा यावर तोडगा काढावा, अशी मागणी आमदारांच्या पीएनी केलीय.
गृह विभागाला लिहिले पत्र : दुसरीकडे आम्हाला विधानभवन विधिमंडळातर्फे ओळखपत्र देण्यात आलंय. त्या ओळखपत्राच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात तरी आम्हाला मंत्रालयात प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी आमदारांच्या पीएनी गृह विभागाला पत्र लिहून केलीय. एकीकडे ही अद्ययावत 'एफआरएस' प्रणाली चांगली आहे. आम्ही तिचे स्वागत करतो. यामुळे मंत्रालयातील गर्दी कमी होईल आणि सुरक्षा यंत्रणेवरील ताणही कमी होईल. खरं तर आमदारांचा पीए हा सामान्यांची कामं करीत असतो. परंतु आता मंत्रालयात प्रवेश मिळत नसल्याने अनेक कामांचा कोळंबा होतोय. त्यामुळे आमच्या मंत्रालयातील प्रवेशावर सरकारने तोडगा काढावा, अशी मागणी आमदारांच्या पीएनी केलीय.
हेही वाचा :