मुंबई: अभिनेत्री स्वरा भास्करनं तिचे एक्स अकाउंट कायमचे निलंबित केल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे. स्वराच्या दोन पोस्टमध्ये कॉपीराइट उल्लंघन झाल्यामुळं तिचं एक्स अकाउंट निलंबन करण्यात आलं असल्याचं उघड झालं आहे. यात एक प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आणि फोटोचा समावेश आहे. तसेच गुरुवारी, तिनं इंस्टाग्रामवर उल्लंघनाच्या सूचनेचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि स्पष्टीकरण दिलं आहे. स्वरानं आपली नाराजी व्यक्त करताना इंस्टाग्रामवर लिहिलं की, 'प्रिय एक्स दोन ट्विटमधील, दोन फोटोंना कॉपीराइट उल्लंघन म्हणून घोषीत करण्यात आले आहे. या आधारावर माझं अकाउंट ब्लॉक करण्यात आलं, मी आता ते अॅक्सेस करू शकत नाही. मी हे दोन फोटो शेअर केले आहेत.'
स्वरा भास्करच्या 'या' ट्विटनंतर अकाउंट झालं सस्पेंड : स्वरानं तिच्या एक्स पोस्टवर लिहिलं की, 'गांधीजी, आम्हाला लाज वाटतं आहे की, तुमचे मारेकरी जिवंत आहेत. हे एक प्रसिद्ध घोषवाक्य आहे, यात कॉपीराइटचे कोणतेही उल्लंघन नाही. हे अगदी एका घोषवाक्यासारखे आहे.' यानंतर स्वरानं प्रश्न उपस्थित केला की, तिच्या मुलीचा फोटो कॉपीराइट उल्लंघन म्हणून कसा दाखवला जाऊ शकतो. तिच्या मुलीच्या प्रतिमेचा कॉपीराइट कोणाकडे आहे? कॉपीराइट उल्लंघनाबद्दलच्या या दोन्ही तक्रारी पूर्णपणे विनोदी असल्याचं स्वरानं सांगितलं. यानंतर स्वरानं पुढं म्हटलं की, 'माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.'
स्वरा भास्करचं वर्कफ्रंट : स्वरा भास्कर नेहमीच तिच्या विचारांबद्दल आणि राजकीय मतांबद्दल सोशल मीडियावर बोलत असते. तिनं राजकीय आणि तिच्या विचारांबद्दल नेहमीच स्पष्ट भूमिका घेतली आहे. यामुळे तिला अनेकदा द्वेषाचाही सामना करावा लागला आहे. सध्या स्वरा तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. तिनं चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. ती शेवटी 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मीमांसा' चित्रपटात दिसली होती. आता तिचा आगामी चित्रपट 'मिसेज फलानी' आहे. या चित्रपटाबद्दल काही दिवसांनी अपडेट येईल. दरम्यान स्वरानं 2023 मध्ये राजकारणी फहाद अहमदशी लग्न केलं. यानंतर तिला राबिया नावाची मुलगी झाली.