कोल्हापूर : हौस करावी तर ती कोल्हापूरकरांनीच असा प्रत्यय आला आहे. 'कोल्हापूरकरांच्या हौसेला मोल नाही' असं उगाच म्हणत नाहीत. एखादी अशक्यप्राय गोष्ट करायची म्हणजे करायचीच, मग त्यासाठी काहीही करायला कोल्हापूरकर एका पायावर तयार असतात. आता हेच बघा की, कोल्हापूर जिल्ह्यातल्या भादवण गावातील गावकऱ्यांनी लक्ष्मीच्या यात्रेला अखंड विमानचं बुक केलं. 50 ते 60 जणांनी मुंबई ते कोल्हापूर असा विमान प्रवास करत यात्रेला हजेरी लावली. कोल्हापुरात उतरल्यानंतर यातील पहिल्यांदाच विमान प्रवास करणाऱ्यांनी आभाळातून खाली बघताना 'फिलिंग ढगात' गेल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. गावकऱ्यांनी केलेल्या या विमान प्रवासाची चर्चा मात्र सध्या जिल्हाभर सुरू आहे.
कुठल्याही कोपऱ्यातून यात्रेला हजेरी : कोल्हापूर जिल्ह्यातला आजरा तालुका निसर्गसंपन्न म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील अनेक जण कामाच्या निमित्तानं मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरात स्थिरावले आहेत. मात्र, वर्षातून एकदा गावच्या लक्ष्मीच्या यात्रेला जगात कुठेही असला तरी भादवणकर हजेरी लावतो. गावची लोकसंख्या जेमतेम 3 ते 4 हजारांच्या घरात. मात्र, गावची यात्रा म्हटलं की, हातातील कामं टाकून गावकरी या यात्रेला पोहोचतोच. याच गावातील आर. बी. पाटील हे मुंबई विमानतळावर कामाला आहेत. त्यांच्याच संकल्पनेतून चार महिन्यांपूर्वी त्यांनी विमानानं यात्रेला जाण्याची संकल्पना मुंबईत असलेल्या गावकऱ्यांसमोर ठेवली. भोळ्या भाबड्या गावकऱ्यांना पाटील आपली चेष्टा करत आहेत असं वाटलं.
अन् गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही : विमानानं यात्रेला जायचं स्वप्न पाहिलेल्या अनेकांनी हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं. दोन महिन्यांपूर्वी मुंबईतून गावाकडं यात्रेसाठी येणाऱ्या 30 जणांचं बुकिंग करण्यात आलं. मुंबई बाहेरील अनेकांना ही संकल्पना आवडली त्यातील काहींनी रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास करून गावकऱ्यांसोबत विमानानं कोल्हापूरला येणार म्हणून आपलंही बुकिंग केलं. यात्रेच्या दोन दिवस आधी म्हणजे गुरुवारी यातील पहिलं विमान 25 जणांना घेऊन कोल्हापुरात उतरलं. त्यानंतर गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. उर्वरित गावकऱ्यांचंही आज सकाळी साडेदहा वाजता खास विमानानं कोल्हापुरात आगमन झालं. यातील अनेकांनी पहिल्यांदाच विमान प्रवास केला असल्यानं विमानतळावर उतरल्यावर हा क्षण मोबाईलमध्ये साठवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत असलेल्या आर. बी. पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला होता, "गावकऱ्यांना ही संधी उपलब्ध करून देता आली याचं समाधान असल्याचं" यावेळी पाटील म्हणाले.
जुळी भावंडं आणि आईचा पहिलाच विमान प्रवास : भादवण गावातील शैलजा मांडेकर या आपल्या दोन जुळ्या मुलांसह मुंबईला कामानिमित्त वास्तव्य करतात. जुळी मुलं उत्सव आणि उत्कर्ष मांडेकर यांच्यासह शैलजा यांनीही आयुष्यात पहिल्यांदाच मुंबई ते कोल्हापूर असा विमान प्रवास केला. कोल्हापुरातील विमानतळावर उतरल्यानंतर 3 हजार रुपये विमान तिकिटासाठी प्रतिव्यक्ती खर्च झाला. मात्र, पैशापेक्षा मिळालेला आनंद शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही अशा भावना शैलजा मांडेकर यांनी व्यक्त केल्या. तर, यात्रेच्या निमित्तानं पहिल्यांदाच विमान प्रवास करताना आकाशातून दिसणारं कोल्हापूरचं रूप डोळ्यात साठवणार होतं, यामुळे माझ्या "फिलिंग ढगात" गेल्या अशी प्रतिक्रिया उत्सव मांडेकर यांनी व्यक्त केली.
भादवणकरांचा दोन दिवस शाकाहारी 'बेत' : भादवणची ग्रामदैवत असलेल्या लक्ष्मी देवीच्या यात्रेला उद्यापासून सुरुवात होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरातून गावकरी आणि भाविक मोठ्या संख्येनं गावात दाखल होत आहेत. लाकडी मूर्ती असलेल्या देवी लक्ष्मीची गावकरी जल्लोषात मिरवणूक काढतात. यासह दोन दिवस शाकाहारी जेवणाचा बेत असल्यानं यात्रेमुळं गावात चैतन्याचं वातावरण असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. तर, विमानानं यात्रेसाठी आलेल्या गावकऱ्यांचंही गावातील मंडळींनी स्वागत केलं. खास यात्रेसाठी केलेल्या विमान प्रवासाची चर्चा मात्र जिल्ह्यात जोरात सुरू आहे.
हेही वाचा :