पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात GBS सिंड्रोमचे 13 संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी 5 रुग्ण हे बरे झाले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जीबीएस सिंड्रोम आजाराला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केलं आहे. ज्या भागात जीबीएस सिंड्रोमचे रुग्ण जास्त आढळून येत आहेत. त्या भागात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं सर्वेक्षण करण्यात येत असून 8 विभागात प्रत्येकी 2 अशी 16 पथकं तैनात करण्यात आली आहेत. या पथकांनी आतापर्यंत 10 हजार 43 घरं तपासली आहेत. दरम्यान या आजारावर पालिकेच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
जीबीएस आजाराची लागण झाल्यानंतर संबंधित तरुणाला न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत जीबीएसचे १३ रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. यापैकी काही रुग्णांना सोडण्यात आलं असून काही रुग्ण उपचार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी जीबीएसची लागण झालेल्या आणि त्यानंतर न्यूमोनिया झालेल्या एका ६७ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेवर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, या महिलेचा मृत्यू जीबीएसमुळे झाला नसल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे. त्यानंतर आता जीबीएसमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या आजारामुळे झाला. उपचारात हयगय झाली का, याची चौकशी करण्यासाठी वायसीएमने नव्याने समिती देखील स्थापन केली आहे. महापालिका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांना विचारले असता, मयत व्यक्ती हा पिंपळे गुरव येथील रहिवासी असून, त्यास निमोनिया व जीबीएस हे दोन्ही आजार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. सदर मयत व्यक्ती ही पिंपरीची रहिवासी असून ओला आणि उबेर या गाडीचा ड्रायव्हर आहे. ज्या दिवशी तो उपचार घेण्यासाठी आला त्यादरम्यान त्यास सर्दी खोकला असल्याचं सांगण्यात आलं. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता चार ते पाच तासातच झिरो पॅरालेसीस झाल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं. रक्ताच्या व इतर तपासण्या केल्या असता दोन्ही फुफ्फुसामध्ये निमोनियाचे अंश त्याच्यामध्ये आढळून आले. त्यामुळे सदर रुग्णाचे दोन्ही पद्धतीने उपचार चालू होते. यशवंतराव रुग्णालयात त्याच्यावर दहा दिवस उपचार चालू होते. परंतु हळूहळू सदर रुग्णाची परिस्थिती नाजूक होत गेल्यानं काल त्याचा मृत्यू झाला. पाणी अथवा जंकफूड खाल्ल्यानं या आजाराचा संसर्ग झाला असावा असं प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी केलं.
हेही वाचा...