कोल्हापूर Republic Day 2024 : 75 वर्षांपूर्वी आपला देश प्रजासत्ताक झाला. आम्ही भारताचे नागरिक म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. तेव्हापासून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन देशात साजरा केला जातो. देशवासियांकडून देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. अनेक जण या दिवशी देशाप्रती भावना व्यक्त करत असतात.
झेंड्याला मोफत ड्रायक्लिन : कोल्हापुरातल्या बिनखांबी गणेश मंदिराजवळ असलेल्या छोट्या ड्रायक्लिनचे दुकान सांभाळणाऱ्या रोहिणी कमते यांचं देशप्रेम जगावेगळं म्हणावं लागेल. वडिलोपार्जित ड्रायक्लिन व्यवसाय 2011 पासून सांभाळत असलेल्या रोहिणी कमते भारतीय स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दुकानात येणाऱ्या सहकारी संस्था, बँका, शाळा, महाविद्यालय, वैयक्तिक भारतीय ध्वज म्हणजेच झेंड्यांना स्वच्छ धुऊन कडक इस्त्री करून देतात. विशेष म्हणजे या सर्व कामाचा त्या कोणताही मोबदला गिऱ्हाईकाकडून घेत नाहीत.
आमचं दुकान शोधत येतात ग्राहक : स्वातंत्र्य दिनाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या आधी चार ते पाच दिवस रोहिनी कमते यांच्या दुकानात तुडुंब गर्दी होते. वडिलांचा व्यवसाय सांभाळत असल्यानं अनेक गिऱ्हाईकांशी त्यांचे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. अगदी साठीच्या पुढचे कोल्हापुरातील नागरिक त्यांचं दुकान शोधत बिनखांबी गणेश मंदिर परिसरात येतात. गिऱ्हाईकांकडून वडिलांचा वारसा चालवत असल्याबद्दल समाधान व्यक्त होतं. याबरोबरच नागरिक हे मोफत स्वच्छ धुतलेला आणि इस्त्री केलेला भारतीय ध्वज घेऊन जाताना समाधान व्यक्त करतात, अशा भावना कमते यांनी व्यक्त केल्या. देशातील कोणताही नागरिक आपल्या कामातून देशाप्रती आदर व्यक्त करत असतो. झेंडे मोफत धुऊन आणि इस्त्री करून देऊन आपणही देशसेवा करत असल्याचं समाधान मिळत असल्याच्या भावना रोहिणी कमते यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या.