नवी दिल्ली Rajya Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर मंगळवारी मध्यरात्री महायुतीमध्ये काही खलबतं झाली आहेत. राज्यसभा निवडणुकीला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला असताना ही बैठक झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच, अजित पवारांमध्ये तब्बल अडीच तास या बैठकीत चर्चा झाली आहे. या बैठकीत मोठा निर्णय झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागा असून सर्वच जागांवर महायुतीनं उमेदवार उतरवण्याचा प्लॅन आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्यासाठी उमेदवार कोणते? हे अद्याप स्पष्ट झालं नाही. आज महायुतीकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
घटक पक्षाला प्रत्येकी 1 जागा : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता राज्यसभेचं गणित बदललं आहे. भाजपा राज्यसभेसाठी चार उमेदवार देण्याची शक्यता आहे. तसच, राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी 1 जागा लढवणार आहेत. महायुतीच्या या गणितामुळे महाविकास आघाडीला राज्यसभेत एकही जागा मिळण्याची शक्यता वाटत नाही.
भाजपा चौथा उमेदवार उभा करण्याच्या तयारीत : उद्या 15 फेब्रुवारी रोजी तीन वाजेपर्यंत राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्या अनुषंगानं सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. राज्यात सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. पक्षीय बलाबल पाहता भाजपा 3, शिवसेना 1 आणि राष्ट्रवादी 1, काँग्रेस 1 असं समीकरण पाहायला मिळतय. मात्र, भाजपा चौथा उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं राज्यसभा निवडणुकीत चुरस वाढणार असं दिसतय.
महाराष्ट्रातील राज्यसभेचं गणित ? : महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. त्यापैकी शिवसेनेचे सांगलीतील आटपाडीचे आमदार अनिल बाबर आणि भाजपाचे अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झालं आहे. तर, नुकताच अशोक चव्हाण यांचा भाजपा प्रवेश, आणि नागपूरचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे.