मुंबई Raj Thackeray Meet Salman :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अचानक मुंबईतील वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जाऊन सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानची भेट घेतली आहे. काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नुकतीच भेट घेतल्यानंतर आज त्यांनी सलमान खान यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मात्र एका विशिष्ट कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे यांनी भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.
राज यांच्याकडून सलमान खान यांची भेट :24 सप्टेंबरला मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेता सलमान खान यांच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. सुमारे 15 ते 20 मिनिटे झालेल्या या भेटीमध्ये दोघांनी चित्रपट क्षेत्रातील गोष्टींवर चर्चा केली. यावेळी राज ठाकरे यांनी "एक नंबर" या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा आयोजित केल्याचं सलमान खानला सांगितलं. तसेच ट्रेलर लॉन्चच्या सोहळ्यासाठी सलमान खान यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.
'एक नंबर'चा ट्रेलर लॉन्च :'एक नंबर' या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा बुधवारी संध्याकाळी वांद्रे येथील ताज लँड एंड हॉटेलमध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमाला अभिनेता आमिर खान, साजिद नाडियाडवाला, आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी, अभिजित जोशी यांच्यासह स्वतः राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राज ठाकरे यांनी सलमान खानला निमंत्रण दिले आहे. खरं तर हा चित्रपट राजकीय क्षेत्रावर आधारित असून, या चित्रपटातील टीझरमध्ये प्रचंड जनसमुदाय पाहायला मिळतोय. टीझरच्या सुरुवातीलाच जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी साद घातली जाते आणि महाराष्ट्रातील एका सुपरिचीत व्यक्तीचा आवाज ऐकू येऊ लागतो. चित्रपटात दंगल, जाळपोळ, हाणामारी यांसारखे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. एकूणच ठाकरे यांच्याशी संबंधित हा चित्रपट असल्याचे टीझरवरून लक्षात येते. या चित्रपटाची निर्मिती तेजस्विनी पंडित, बवेश जाणवेलकर आणि वरदा साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट येत्या 10 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचाः
'शिवतीर्थ'वरील मनसेची बैठक सोडून राज ठाकरे 'वर्षा'वर शिंदेंच्या भेटीला; मुंबईत घडामोडींना वेग - Vidhan Sabha Election 2024
"काँग्रेसकडून नाना पटोले मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार"; काँग्रेस आमदाराचा दावा - Nana Patole CM Post