महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"लाडका भाऊ-लाडकी बहीण आतापर्यंत एकत्र राहिले असते तर..." राज ठाकरेंचा कुणाला टोला? - Raj Thackeray on Assembly election - RAJ THACKERAY ON ASSEMBLY ELECTION

लोकसभा निवडणुकीत भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची घोषणा केली.

Raj Thackeray on Assembly election
Raj Thackeray on Assembly election (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 1:24 PM IST

Updated : Jul 25, 2024, 2:17 PM IST

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. राज ठाकरे यांनी विधानसभेत 225 ते 250 जागा लढवणार अशी घोषणा दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे १ ऑगस्टपासून राज्यात दौरा करणार आहेत. मनसे अध्यक्ष म्हणाले, " विधानसभेत मनसेचे आमदार बसविणार आहे. जे निवडून येतील त्यांनाच तिकीट देण्यात येणार आहे. युती होईल की नाही, हा नंतरचा विषय आहे. तयारीला लागा"

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता मैदानात उतरली आहे. 2024 ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी जाहीर केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून सर्वे केला. या सर्वेतून मिळालेल्या अहवालानुसार राज ठाकरे यांनी आज मुंबईत पदाधिकारी मेळावा घेत आपला निर्णय जाहीर केला आहे. " कोणत्याही परिस्थितीत माझा पक्ष सत्तेत सहभागी झाला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. तुम्ही सर्वजण तयार व्हा. कोणाचा प्रस्ताव येईल आणि किती जागा उपलब्ध होतील याची वाट पाहण्याची गरज नाही", अशा सूचनादेखील मनसेचे अध्यक्ष ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजनांवरून राजकारण-राज्यात सध्या मुख्यमंत्र्यांच्या लाडका भाऊ आणि लाडकी बहीण या दोन योजनांची चर्चा आहे. या योजनांवरदेखील राज ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले की, "सध्या लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजनांची चर्चा सुरू आहे. त्यावरूनदेखील राजकारण करत आहेत. पण, सरकारकडे मूळ प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. या योजना जाहीर केल्या जात आहेत. पण, लोकांना पैसे द्यायला शासनाच्या तिजोरीत पैसे आहेत का? रस्त्यांवर एवढे खड्डे पडले आहेत ते बुजवयाला यांच्याकडं पैसे नाहीत." "लाडका भाऊ आणि लाडकी बहीण आतापर्यंत एकत्र राहिले असते, तर दोन पक्ष फुटले नसते," असा टोला यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी लगावला.

तुमची स्वतःची रणनीती असली पाहिजे-राज ठाकरेंनी 200 हून अधिक जागांचा सर्वे अहवाल पाहून विधानसभा निवडणुकीकरिता आढावा घेतला आहे. युतीसाठी कोणी हात पुढे केला तर राज ठाकरे त्यावर आपला प्रस्ताव मांडणार आहेत. सध्या एनडीएमध्ये भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सामील आहेत. महायुतीला गरज नसेल तर राज ठाकरे आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. राज ठाकरे म्हणाले की, "फक्त मोठ्यानं घोषणा दिल्या की तुमची विधानसभेवर तिकीट दिले जाईल, असं समजू नका. यासाठी सर्व चाचण्या घेतल्या जातील. आपल्या भागात कॅम्पेन करा. तुमची स्वतःची रणनीती असली पाहिजे. लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या. आपली एक टीम तुमच्या इथे येईल. आढावा घेतला जाईल. त्यानंतरच सर्व गोष्टी ठरवल्या जातील." असंदेखील राज ठाकरे यांनी उमेदवारी निवडीबाबत जाहीर केलं आहे.

हेही वाचा-

  1. विधानसभा निवडणुकीत 'सिंगल लाईन'वर धावणार मनसेचं रेल्वे इंजिन - MNS on Assembly Election
  2. "...तर जातीच्या नावावर रक्तपात सुरू होईल, विधानसभा निवडणुकीत मी रशिया युक्रेनचा प्रचार करणार"; राज ठाकरे असं का म्हणाले? - Raj Thackeray
Last Updated : Jul 25, 2024, 2:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details