मुंबई Bombay High Court Orders :कौसा-मुंब्रा येथे नव्यानं बांधण्यात आलेल्या 100 खाटांच्या पालिका रुग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा लागू करण्याचे आदेश सोमवारी (29 जानेवारी) मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला दिलेत. न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं आदेशात म्हंटलंय की, "जीवनाचा अधिकार म्हणजे त्यात सन्मानानं जगणं समाविष्ट आहे आणि हा अधिकार टिकवून ठेवण्यासाठी परवडणारी सार्वजनिक आरोग्य सेवा अत्यावश्यक आहे. तसंच नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रुग्णालयाचे पूर्णत्व आणि कार्यान्वित करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळं रुग्णालयात गरिबांना मोफत वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी."
काय आहे प्रकरण :मुंब्रा कौसा या ठिकाणी शासनाचे रुग्णालय तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानंतर पंधरा वर्षांपासून रुग्णालयासंदर्भात सर्व मंजुरी मिळाल्या. परंतु तेथे खासगी पद्धतीनं वैद्यकीय सेवा सुविधा दिल्या जाण्याचा विचार शासनातर्फे होत होता. त्याला असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक राइट्स या संस्थेच्या वतीनं आव्हान दिलं गेलं. लाखो लोक या वैद्यकीय सेवा सुविधावर अवलंबून आहेत. त्यामुळं त्यांना मोफत आरोग्य सेवा सुविधा मिळाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.