मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री कोणत्या कारणामुळे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले आहेत, याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळाली नाही. मात्र, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले, "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख ठाकरे यांनी फडणवीस यांना मुंबईतील दादर परिसरातील शिवाजी पार्कजवळील त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होतं." उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या महिन्यात राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार निशाणा साधला होता. "कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या नेत्यांना तुरुंगात टाकलं जाईल, असे भाजपानं म्हटलं होतं. प्रत्यक्षात त्यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं," अशी टीका मनसे अध्यक्षांनी केली होती.
राज ठाकरेंनी काय म्हटलं होतं?- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भ्रष्टाचारी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यानं नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमैय्या यांनी आरोप केलेले सगळे लोक भाजपामध्ये गेले आहेत. त्यांनी आरोप केलेले पक्षात घेऊन मंत्री झाले. भाजपानं ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्या सगळ्यानं पक्षात घेऊन मंत्री केलं. मोदी ४ दिवस आधी म्हणाले होते, ७० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारांना तुरुंगामध्ये टाकू. त्यानंतर मोदींनी त्यांना तुरुंगाऐवजी थेट मंत्रिमंडळात घेतलं. माझ्या मागे ईडी लावल्यामुळे मोदींना पाठिंबा दिल्याचं माध्यमं म्हणतात. पण, राज ठाकरेचे व्यवहार इतके स्वच्छ असतात, तो ईडीला घाबरेल का?" असा प्रश्नदेखील राज ठाकरेंनी उपस्थित केला.
- विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. या निकालावरही राज ठाकरेंनी शंका व्यक्त केली होती. राज ठाकरे यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, मनसेनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली. परंतु मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही.
राज ठाकरे-फडणवीस भेटीवर संजय राऊतांची टीका- खासदार संजय राऊत म्हणाले, "राज ठाकरेंनी शिवाजी पार्कला एक कॅफे उघडलेलं आहे, एवढेच मला माहीत आहे. तिथे लोकं सातत्यानं चहापानाला जात असतात. तो कॅफे सगळ्यांसाठी खुला आहे. ही एक चांगली गोष्ट आहे की, राजकारणामध्ये असं चहापान होत असतं. तो कॅफे चांगला असेल, असं मला वाटतं." संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर टोला लगावत म्हणाले, "लोकांनी तिकडे जावं तिथला नजारा पाहावा."
हेही वाचा-