सातारा : ईव्हीएमविरोधात मारकडवाडी गावात आंदोलन उभं राहत असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ईव्हीएमवर मोठं भाष्य केलं. "ईव्हीएमबद्दलचा माझा 2019 चा जुना व्हिडिओ दाखवला जातोय. ईव्हीएम मशीनमध्ये ट्रान्समीटर आणि रिसिव्हर नाही, अशी माझी माहिती आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम हॅक करता येणार नाही, असं मी त्यावेळी म्हटलं होतं. परंतु, व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करुन आंतरराष्ट्रीय समिती नेमून मशीनची तपासणी केली पाहिजे, अशी माझी आता मागणी आहे," असं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावरही हल्लाबोल केला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Reporter) जागतिक तज्ज्ञांकडून ईव्हीएमची तपासणी व्हावी :"ईव्हीएमबद्दलचा माझा 2019 चा जुना व्हिडिओ दाखवला जातोय. ईव्हीएम मशीनमध्ये ट्रान्समीटर आणि रिसिव्हर नाही, अशी माझी माहिती आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम हॅक करता येणार नाही, असं मी त्यावेळी म्हटलं होतं. परंतु, आंतरराष्ट्रीय समिती नेमून मशीनची तपासणी केली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. ठराविक मशिनमधील मतं मोजण्यापेक्षा सर्वच मशिन आणि व्हीव्हीपॅटमधील मतं मोजली जावीत. त्यासाठी काही दिवस लागतील, पण हे नाही केलं तर लोकांचा संशय वाढेल," असंही त्यांनी सांगितलं.
माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Reporter) ईव्हीएमवरील संशयाचं वातावरण दूर करा :"ईव्हीएममध्ये प्रोग्रामिंग करणं शक्य आहे. जगातील प्रगत देशांमध्ये ईव्हीएमवर निवडणुका होत नाहीत. भारतात हट्टानं ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या जातात," असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला. "भारतातील लोकशाही टिकावी, ही जगातील लोकशाही प्रेमी नागरिकांची इच्छा आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत आणि निकालाबाबत सामान्य नागरिकांच्या मनात असलेलं संशयाचं वातावरण केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारनं दूर करावं," असं आवाहनही त्यांनी केलं.
...तर संविधानाला अर्थ उरणार नाही :विधानसभा निवडणूक निकालावर बोलताना ते म्हणाले की, "देशातील लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण झाला, त्यामुळे देशात लोकशाही जिवंत आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. लोकशाहीत चढउतार येतात. परंतु, सध्याचा निकाल हा आश्चर्यकारक आहे. लोकशाही पद्धतीनं निवडणूक घेतली हे सिद्ध करण्याची जबाबदारी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारची आहे. त्यामुळं लोकशाहीवर सामान्य लोकांचा विश्वास बसेल, यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील," असंही ते म्हणाले.
माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर हल्लाबोल :"पक्षांतर बंदीवर माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे निर्णय देतील, अशी अपेक्षा होत्या, पण तो निर्णय झाला नाही. निर्णय न घेऊन आणि बेकायदेशीर सरकारला सहकार्य करून एक प्रकारे त्यांनी लोकशाहीचा खून करण्यास मदत केली," असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
जनतेनं का नाकारलं याचा अभ्यास करा, शंभूराज देसाईंचा हल्लाबोल :मारकडवाडीतील मतदानासंदर्भात प्रतिक्रिया देताना माजी मंत्री शंभूराज देसाईंनी महाविकास आघाडीला टोला लगावला. "तुम्हाला विजय मिळतो. तुम्हाला जागा जास्त मिळतात, तेव्हा ईव्हीएम चांगलं असते. पराभव होतो, तेव्हा ईव्हीएम खराब असते. हा रडीचा डाव आहे. पराभवापासून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. ईव्हीएम मशीनवर खापर फोडण्यापेक्षा जनतेने का नाकारलं, याचा विरोधकांनी अभ्यास करावा," असा खोचक सल्ला त्यांनी दिला.
हेही वाचा :
- महाराष्ट्रातील जनता संविधान वाचवण्याची लढाई ताकदीनं लढेल - पृथ्वीराज चव्हाण
- मोहन भागवत अन् भाजपा फॅसिस्ट विचारांचे; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका
- महाराष्ट्रात सत्ताबदल करण्यासाठी कराड दक्षिणच्या जनतेचं मतदान; पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया