नागपूर OBC Leader Babanrao Taywade : राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर मनोज जरांगेंनी मुंबईच्या दिशेनं निघालेलं आंदोलन मागं घेत असल्याचं जाहीर केलंय. यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले "सरकारनं त्यांच्या मागण्या पूर्ण केल्यात असं त्यांना वाटत असेल, त्यांचं समाधान झालं असेल आणि त्यांनी आंदोलन मागं घेतलं असेल, तर मी त्यांच अभिनंदन करतो." तसंच सरकारनं मराठा समाजाला समाधानी केलं, त्याबद्दल सरकारचंही त्यांनी अभिनंदन केलंय.
राजपत्रात नवीन काही नाही : सरकारनं आज काढलेल्या अधिसूचनेबाबत बोलताना बबनराव तायवाडे म्हणाले की, "इथं महत्त्वाचा प्रश्न आहे की, कालपर्यंत सगे सोयऱ्यांच्या बद्दल जे काही बोलल्या जात होतं, त्यासंदर्भात मी बोलताना सांगितलं होतं की सगे सोयरे म्हणजे काय तर वडील, आजोबा आणि पंजोबा यांच्या शैक्षणिक आणि महसुली कागदपत्रावर जी जात दिलेली असेल, ती त्यांच्या मुलांना आणि नातवंडांना लागू असते. तेच या राजपत्रात दिलेलं आहे. नवीन काय दिलेलं नाही, त्यामुळं आमच्या आरक्षणाला कुठंही धक्का लागलेला नाही."