अमरावती : विदर्भातील संत्र्याची गोडी ( Nagpur oranges News) ही संपूर्ण जगानं चाखलीय. परंतु, असं असताना गत काही वर्षांपासून विदर्भातील संत्रा उत्पादक अडचणीत आहेत. संत्रा उत्पादनासंदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अनेक गैरसमज पसरविण्यात येत आहेत. खरंतर संत्रा उत्पादकांनी तंत्रज्ञानासोबतच आपला माईंडसेट बदलला, तर विदर्भातील संत्र्याला प्रीमियम मार्केट मिळणं अगदी सोपं आणि शक्य आहे.
"संत्रा उत्पादकांनी थोडा बदल स्वीकारण्याची तयारी दर्शवली तर विदर्भात पुन्हा एकदा संत्रा चांगला बहरेल. तसंच संत्रा उत्पादकांना भरभराटीचे दिवस येतील", असा विश्वास जळगाव येथील जगविख्यात कृषितज्ञ डॉ.के. बी पाटील यांनी व्यक्त केलाय. गोड आणि दर्जेदार संत्र्यांचा विदर्भ अशी विदर्भाची ओळख कायम राहावी, यासाठी संत्रा उत्पादकांनी नेमकं काय करायला हवं? यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
कृषी तज्ञांच्या प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) संत्र्याला हवी निचऱ्याची जमीन : "विदर्भात वरुड, मोर्शी, अंजनगाव सुर्जी, अकोट, चांदूरबाजार, नागपूर या पट्ट्यात सर्वाधिक संत्र्यांचं उत्पादन होतं. हा संपूर्ण भाग काळ्या जमिनीचा आहे. खरंतर काळ्या जमिनीत संत्रा येतो, हा एक मोठा गैरसमज आहे. ब्राझील, स्पेन, ऑस्ट्रेलिया, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, कोलंबिया, कोस्टारिका, इजरायल, तैवान या देशांमध्ये उत्तम संत्रा येतो. या देशात संत्र्याला कुठंही पाटानं पाणी दिलं जात नाही. ठिबकद्वारे संत्र्याला पाणी दिलं तर संत्रा हा उत्तमरीत्या फुटतो. जगाच्या पाठीवर कुठेही काळ्या कसदार मातीत संत्र्याचं पीक घेतलं जात नाही. काळ्या जमिनीपेक्षा निचऱ्याची जमीन संत्र्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे", असं डॉ. के. बी. पाटील म्हणाले.
असं हवं संत्रा उत्पादनाचं नवं मॉडेल (ETV Bharat Graphics) संत्रा नुकसानामागे 'ही' आहेत कारणं : "आपण मातीमध्ये वाफ्यावरती संत्र्याच्या कलमा तयार करत असताना त्याच्यावरती रंकुर लाईम आहे की निमावकारवा याचा आपल्याला पत्ता नसतो. त्यात नेमके कोणते घटक आहेत? ते आपल्याला माहिती नसतं. पंजाबमधून आलेल्या गलगलच्या बियाण्यावरती संत्र्याच्या कलमा तयार होत आहेत. त्या संत्र्यांच्या कलमांमधून फायटोप्थोरा आणि ग्रीनिंग नावाचा रोग वाढतोय. गतवर्षी केंद्र सरकारच्या पथकानं अंजनगाव सुर्जी, अकोट, परतवाडामध्ये काही संत्रागळ झाली होती. त्याचं मुख्य कारण हे ग्रीनिंग नावाचा आजार असल्याचं स्पष्ट सांगितलं होतं", असंही पाटील म्हणाले.
संत्रा जिवंत ठेवण्याची गरज : पुढं ते म्हणाले की, "विदर्भातील संत्रा हा 'नागपुरी संत्रा' म्हणून ओळखला जातो. या संत्र्याची चव अतिशय मधुर आहे, म्हणूनच खऱ्या अर्थानं संत्र्याला जिवंत ठेवण्याची गरज आहे. यामुळंच संत्र्याची शेती करण्याचं मॉडेल बदलणं गरजेचं आहे. खानदेशातील केळी बागायतदारांनी केळीच्या उत्पादनासंदर्भात बदल स्वीकारला. अगदी तसाच बदल विदर्भातील संत्रा उत्पादकांनी स्वीकारायला हवा."
संतुलित अन्नघटकांचा वापर : फुलांचं फळांमध्ये रूपांतर होऊन त्या फळाची वाढ व्हावी. त्याचा फळाचा विकास व्हावा यासाठी वाढीच्या अवस्थेनुसार ठिबकमधून फर्टिगेशनद्वारे संतुलित अन्न घटकांचा वापर हा संत्र्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. संत्रा वाढीच्या अवस्थेमध्ये त्याला फॉस्फरस देणं जास्त गरजेचं आहे. तसेच मधल्या काळात नायट्रोजन गरजेचं आहे. शेवटच्या काळामध्ये छोटासा नायट्रोजन, मोठ्या प्रमाणामध्ये पोटॅश गरजेचा आहे. यामुळं या संत्र्यांमध्ये साखर उतरेल. ते चवीला गोड लागतील.
फॉस्फरिक ऍसिडची गरज : पुढं बोलत असताना पाटील यांनी सांगितलं की, "2007 मध्ये आम्ही जळगाव येथील जैन इरिगेशनच्या माध्यमातून खानदेशात फॉस्फरिक ऍसिडचा प्रयोग केळीवर केला. देशात हा पहिल्यांदाच करण्यात आलेला प्रयोग होता. फॉस्फरिक ऍसिडच्या मदतीनं झाडांच्या मुळाच्या कक्षेतील पीएच कमी करणं शक्य झालं. संत्रा झाडाच्या मुळाशी असणारं पीएचदेखील कमी करण्यासाठी फॉस्फरिक ऍसिड महत्त्वाचं ठरेल. याच्या वापरामुळं झिंक, फेरस, बोरॉन, मॅग्नीशियम, फॉस्फरस याची उपलब्धता झाडाला होईल. यामुळं झाड आरोग्यदायी आणि बळकट होईल. झाड सुदृढ असेल तर त्याचं फळदेखील उत्तम दर्जाचं निघेल. फळाचा रंग छान दिसेल. त्यात गोडवा निर्माण होईल. विदर्भातील संत्री दिल्ली, जम्मू काश्मीर, बंगलोर, हैद्राबाद, मुंबई, पुणे या बाजारात नागपुरी संत्रा पुन्हा एकदा मोठं नाव कमवेल", असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
संत्र्याचं जुनं एक झाड हे 200 ते 4000 पर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात फळ देतं. इतकी फळं देणारं झाड दुसरं कुठलंही नाही. पुन्हा थोडं जुनं आणि थोडं नवीन असा सुवर्णमध्य आपण साधला तर संत्राबागा पुन्हा एकदा विदर्भात समृद्धी निर्माण करतील- प्रा. राजेंद्र पाटील, कृषितज्ञ
सुवर्णमध्याद्वारे संत्रा बागेत समृद्धी : "विदर्भातील काळ्या जमिनीत संत्रा बागा बहरल्या आहे. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे पूर्वी शेतकऱ्यांकडं मोठ्या प्रमाणात जनावरं होती. यामुळं या संत्राबागांमध्ये शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर व्हायचा. शेणखतामुळं ही काळी जमीन निचऱ्याची जमीन व्हायची. मात्र, आज शेणखत कुठंही दिसत नाही. याच कारणानं संत्र्यासाठी हवी असणारी निचऱ्याची जमीन या भागात राहिली नाही", असं अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील कृषितज्ञ प्रा. राजेंद्र पाटील यांनी सांगितलं. पुढे कृषितज्ञ प्रा. पाटील म्हणाले, "अयोग्य ठिकाणच्या अयोग्य प्रतीच्या कलमा बागायतदारांनी लावल्या आहेत. यामुळं संत्रा उत्पादकांना याचा मोठा फटका बसला. संत्रा बागा ठराविक बाबींच्या प्रादुर्भावावर जर आपण मात करू शकलो तर निश्चितच आशादायी पीक म्हणून या विदर्भात संत्रा बहरेल."
हेही वाचा -
- विदर्भात थंडीची लाट, चिखलदरात भर दुपारी शेकोटी; संत्रा उत्पादक अडचणीत
- Farmer Cut Orange Farm अमरावतीत नुकसानीमुळे संत्र्यांच्या झाडांवर शेतकऱ्यांनी चालवली कुऱ्हाड
- Amravati News: अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादनावर संकट; शेतकऱ्यांची अवस्था बिकट