मुंबई Mumbai Rain :राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरुन वाहताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह उपनगरात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पहाटे पासूनच तासा-तासानं विश्रांती घेत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.
पावसाचा वाढला जोर : पहाटे पासूनच मुंबईत रिमझिम पाऊस सुरु आहे. मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी टप्प्याटप्प्यानं विश्रांती घेत जोरदार पाऊस कोसळत आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे लोकल वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला असून पाच ते दहा मिनिटं उशिरानं लोकल धावत आहेत. चाकरमान्यांची कामावर जाताना मात्र तारांबळ उडाली आहे. मुंबईतील दादर, परेल, हिंदमाता, चर्चगेट, सीएसटी परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई उपनगरात देखील पावसाचा जोर वाढला असून अंधेरी, वांद्रे, सांताक्रुज, मालाड, बोरिवली परिसरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी येथील भुयारी मार्ग बंद करण्यात आला. मुंबई महापालिकेकडून सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.