अमरावती : तिवसा तालुक्यातील मोझरी लगत असलेल्या मालधुर येथे रविवारी (2 फेब्रुवारी) रात्री अंदाजे एक वर्षाचं बिबट्याचं पिल्लू विहिरीत पडल्याची घटना घडली. दरम्यान, चांदुर रेल्वे वनविभागाच्या रेस्क्यू टीमच्या मदतीनं या बिबट्याच्या पिल्लाला सुखरूप विहिरीतून बाहेर काढण्यात आलं आहे. मालधुर येथील अरविंद साबळे यांच्या मालकीची विहीर गावालगतच्या शेतात आहे. रात्रीच्या वेळी शेतशिवारातून जात असताना बिबट्याचं पिल्लू विहिरीत पडलं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रात्रीच्या अंधारात विहिरीत पडलं पिल्लू : अरविंद साबळे यांच्या शेतातील विहिरीत हे बिबट्याचं पिल्लू पडलं होतं. साबळे यांच्या शेतात सध्या तूर पीक काढणीचं काम सुरू आहे. आज सकाळी शेतातील कामावर असणारे मजूर विहिरीतील पाणी काढण्यासाठी गेले असता त्यांना बिबट आढळून आला. ही माहिती तत्काळ येथील शेत मालक, सरपंच, गावकरी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसंच बिबट्या विहिरीत अडकून पडल्याची माहिती मिळताच गावातील लोकांनी विहिरीजवळ मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं.
प्राणीमित्र उतरला विहिरीत : अनकवाडी येथील सर्प मित्र आणि प्राणीमित्र शुभम विघे आणि वनविभागाच्या रेस्क्यू पथकानं घटनास्थळी धाव घेतली. चांदूररेल्वे येथील वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं साडे अकरा वाजता पाचारण करून अर्ध्या तासात सदर बिबट्याच्या पिल्लाला सुखरूप बाहेर काढलं. यावेळी सर्पमित्र शुभम विघे यानं जीवाची पर्वा न करता विहिरीत दोरीच्या सहाय्यानं उतरुन बिबट्याला काढण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली. विहिरीत अडकलेल्या बिबट्याला जाळीच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात कैद केलं. त्यानंतर बिबट्याची वन परिक्षेत्र चांदूररेल्वे येथे नोंद करून पिल्लाला वैद्यकीय चाचणीसाठी अमरावती येथे नेण्यात आलं. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी भानुदास पवार, तिवसा वनपाल एस डब्ल्यू घोडमारे वनरक्षक पी. ए. अंबाडकर, वनरक्षक श्री.डायरे, वनरक्षक ऐश्वर्या खोडे, अमरावती येथील रेस्क्यू टीम, परतवाडा येथील पशु वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा -