मुंबई- 1 फेब्रवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झालाय. रुपया मजबूत करण्यासाठी अर्थसंकल्पातून काही योजना आहेत का? अर्थसंकल्पातून महागाई कमी करण्यासाठी काही आहे का? महागाई कमी नाही झाली तर मग मध्यमवर्गीय आणि गरिबांचे भले कसे होणार? अर्थमंत्री पदावर असणारी व्यक्ती ही खडूसच असते. अर्थमंत्री तिजोरीत कसा महसूल जमा होईल आणि लोकांचे कसे पाकीट मारता येईल हे बघते. पंतप्रधानांना ज्या गोष्टीचा वाईटपणा घ्यायचा नसतो ते अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून घेत असतात. 12 लाखांपर्यंत करमुक्तीशिवाय काहीही नाही. मुळात 12 लाख इन्कम टॅक्स भरण्यासाठी तेवढा इन्कम आणावा लागेल. आज अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून काम करतात. अर्थसंकल्प समजायला किमान 72 तास लागतात. हा किती लोकांना अर्थसंकल्प समजला. आपल्याकडे असे किती तज्ज्ञ आहेत? मोदी बाक वाजवत होते. परंतु मोदींना तरी अर्थसंकल्प समजला का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित करत अर्थसंकल्पावर टीका केली, आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस का घाबरताहेत? : उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला, तेव्हा टोपलीभर लिंबू सापडले होते, असं माजी मंत्री रामदास कदमांनी आरोप केले आहेत. यावर बोलताना राऊत म्हणाले की, ते स्वामी रामदास नाहीत, लिंबू आणि काळ्या जादूसंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे किंवा तो कायदा आहे. त्यावर त्यांनी कारवाई केली पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे की, देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत? देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला जायला का घाबरतात? याचे उत्तर रामदास कदम, एकनाथ शिंदे किंवा भाजपातील प्रवक्त्यांनी द्यावे. देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाही, एवढाच माझा सवाल आहे. त्यांचं कुटुंब का घाबरत आहे. तिथे लिंबू आहेत. अजून काय आहे. तुम्हाला कसली भीती वाटते. वर्षा बंगल्यावर असं काय घडवलंय की ज्यामुळे तुम्ही तिकडे राहायला जात नाही. हा एक महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी लोकं तडफडतात. पण देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? माझ्या माहितीप्रमाणे वर्षा बंगला पाडून तिथे नवीन बंगला उभारण्यात येणार असल्याचेही समजतंय, असं राऊत म्हणालेत.
मुख्यमंत्र्यांनी शिंदेंच्या मंत्र्यांना वठणीवर आणले : शिंदे गटातील मंत्र्यांना त्यांचे सचिव नेमण्याचा अधिकार नाही. तो अधिकार मुख्यमंत्री फडणवीसांकडे असणार आहे, असा प्रश्न राऊतांना विचारला असता ते म्हणाले, केंद्रामध्ये मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये तसेच आहे. महाराष्ट्रामध्ये फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये असे होणार असेल तर चांगले आहे. जर मुख्यमंत्री त्याबाबत शिस्तीच्या संदर्भात अशा प्रकारे काही ठरवलं असेल तर त्याच्यावरती फार टीका करण्याचे कारण नाही. पण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि त्यांची लोक दोन अडीच वर्षांपूर्वी मोकाट सुटली होती, त्यांना वठणीवर आणण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलंय. शिंदेंचे मंत्री हे राज्य, मंत्रालय, आणि खाती मनाप्रमाणे चालवत होते. त्यावर जर मुख्यमंत्र्यांनी अनुशासन आणले असले तर त्याचे स्वागत करायला पाहिजे, कोणाही येऊन सचिव म्हणून सचिवाच्या माध्यमातून पैसे गोळा करीत होते. पण त्याच्यावर मुख्यमंत्री नियंत्रण आणत असतील तर त्याच्यावरती फार टीका व्हावी असं मला वाटत नाही, असं राऊत म्हणालेत.
दादांनी ईडीकडील संपत्ती सोडवून घेतली : अजित पवार हे मंत्रिमंडाळातील अभ्यासू मंत्री होते, असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. अजित पवार हे भरवशाचे सहकारी होते, अजित पवार हे अनेक कामं सहज मार्गी लावत होते. कॅबिनेटच्या माध्यमातून एखाद्याला आपल्या मर्यादा कळल्या, रिंगण कळलं, रेषा कळली की तो यशस्वी होतो आणि शांतपणे काम करू शकतो. अजित पवार यांना सध्या मुख्यमंत्री व्हायचं नाही, असं मला दिसतंय. अजित पवार यांनी आपल्यावरचे जे ईडीचे संकट होते, ते दूर करून घेतलंय आणि पक्षांतर करू ईडीच्या ताब्यातील संपत्ती सोडवून घेतली. माणसाला यापेक्षा आणखी काय हवं असतं? पण एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असतानाही मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असतानाही त्यांना मुख्यमंत्रीच व्हायचं आहे. हा दोन्ही नेत्यांमधील फरक आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
...म्हणून हे आमदार चिकटून आहेत : राज्यातील कंत्राटदार हे आंदोलन करताहेत. त्यांच्याकडून कामं करून घेतलीत. कामाच्या नावाखाली निवडणुकीच्या आधी त्यांच्याकडून निधी दिला गेला. त्यामुळं दोन-अडीच वर्षांमध्ये किती हजार कोटी आमदारांच्या खिशात गेले असतील, याचा विचार करा. त्यांनी पक्ष का सोडला? शिंदे गट आणि अजित पवार गटाला किमान 20000 कोटी रुपये आधीच देण्यात आलेले होते. हे तुम्हाला स्पष्ट दिसतंय. 80,000 कोटींचं कंत्राट देऊन त्यातून 25 टक्के हे कमिशन मंत्री आणि आमदारांना मिळालंय. म्हणून फुटीर आमदार अजूनही अजित पवार गट आणि शिंदे गटाला चिकटून आहेत, असा घणाघाती आरोप संजय राऊतांनी केलाय. आता यात मोठा भ्रष्टाचार झाला, ते 80 हजार कोटी कंत्राटादारांना मिळत नाहीत, म्हणून ते रस्त्यावर उतरलेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांवर केलाय. तसेच भाजपामध्ये भ्रष्टाचारी गेले की, ते आमदार, खासदार होतात. त्यांना प्रतिष्ठा मिळते. भाजपामध्ये चोर, लफंगे गेले की ते पवित्र होतात आणि नंतर ते खासदार आणि मंत्री होतात, अशी टीकाही संजय राऊतांनी भाजपावर केलीय.
हेही वाचा -