मुंबई : टीव्ही तसेच चित्रपटांच्या जगात चांगली कामगिरी करणारी निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूरची 'नागिन' मालिका ही नेहमीच हिट राहिली आहे. आतापर्यंत या मालिकेचे 6 सीझन प्रदर्शित झाले आहेत. या मालिकेचा प्रत्येक सीझन प्रेक्षकांना खूप आवडला आहे. आता 'नागिन' मालिकेच्या 7व्या सीझनसाठी एकता कपूर कास्टिंगकडे विशेष लक्ष देत आहे. 'नागिन' शोमध्ये प्रत्येक वेळा मुख्य अभिनेत्रीचा नवीन चेहरा दाखविण्यात आला आहे. यावेळी एकता पुन्हा तिच्या मालिकेत नवीन चेहरा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. एकतानं अलीकडेच 'नागिन 7'ची घोषणा करून प्रेक्षकांना खुश केलं आहे.
एकता कपूरनं केली 'नागिन 7'ची पुष्टी : एकता कपूरनं तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिनं, 'नागिन 7' असं लिहिलं आहे. याशिवाय या व्हिडिओमध्ये ती म्हणते, "जर कोणाला नागिन कुठे आहे हे जाणून घ्यायचे असेल तर सांगा." यानंतर व्हिडिओमध्ये 'नागिन 7'ची टीम ही मीटिंग टेबलावर असल्याची दिसली. यामध्ये पूर्ण टीम ही 'नागिन' मालिकेवर बोलताना दिसते. एकता सध्या 'नागिन 7'साठी नियोजन करताना दिसत आहे. 'नागिन' या शोमधून अनेकांनी फेम मिळवलं आहे. यापैकी एक ही मौनी रॉय आहे. या मालिकेनंतर तिला अनेक चित्रपटांचे ऑफर्स येऊ लागल्या होत्या. हा शो खूप हिट झाला होता.
'नागिन'च्या 6 सीझनमधील अभिनेत्री : 'नागिन' हा शो 2015मध्ये सुरू झाला होता. या शोची टीआरपी आणि लोकप्रियता पाहून एकतानं 6 सीझन प्रेक्षकांसमोर आणले. आता यावेळी या शोमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळेल, असं सध्या दिसत आहे. दरम्यान एकता कपूरनं शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. 'नागिन 7' मालिकेच्या रिलीजची वाट प्रेक्षक पाहात आहेत. तसेच काहीजण यावेळी या शोमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून कोण असणार हा सवाल देखील एकताला विचारताना दिसत आहेत. तसेच काही यूजर्स या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.'नागिन'च्या सहा सीझनमध्ये मौनी रॉय, व्यतिरिक्त, तेजस्वी प्रकाश, सुरभी ज्योती, सुरभी चंदना, निया शर्मा या मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या.