महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील अर्ध्याहून अधिक बेकऱ्या अनधिकृत, प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेची 650 बेकऱ्यांना नोटीस - BMC ACTION BAKERIES POLLUTION

आता महापालिकेने बेकरी व्यावसायिकांनादेखील प्रदूषणासाठी कारणीभूत ठरवले असून, तब्बल 650 बेकरी व्यावसायिकांना पालिकेने यासंदर्भात नोटिसा पाठवल्यात.

Bmc Action Bakeries Pollution
बेकऱ्यांवर पालिकेची कारवाई (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2024, 2:37 PM IST

मुंबई - पावसाळा संपल्यानंतर मुंबईतील प्रदूषणात वाढ होताना दिसते. विशेष म्हणजे हे चित्र दरवर्षी पाहायला मिळतं. त्यानंतर महापालिकेलाही जाग येते आणि नियम जारी केले जातात. परंतु ते नियमही अनेक कंपन्या जवळपास धाब्यावर बसवतात. परंतु यंदा मात्र पालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, मुंबईत प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या बांधकामांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केलीय. प्रदूषण करणाऱ्यांविरोधात कारवाई करत पालिकेने एकाच दिवसात तब्बल 56 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केलाय. महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईत अनेक पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. त्यातून वातावरणात मिसळणारी धूळ, गाड्यांमधून उत्सर्जित होणाऱ्या धुरामुळे प्रदूषणात वाढ होते. मात्र, आता महापालिकेने बेकरी व्यावसायिकांनादेखील प्रदूषणासाठी कारणीभूत ठरवले असून, तब्बल 650 बेकरी व्यावसायिकांना पालिकेने यासंदर्भात नोटिसा पाठवल्यात.

बेकरी व्यावसायिक भंगार लाकूड इंधन म्हणून वापरतात :महापालिकेच्या म्हणण्यानुसार, बेकरी भट्ट्या हेदेखील वायू प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. मुंबईतील 47 टक्के बेकरी व्यावसायिक भट्टीसाठी भंगार लाकूड इंधन म्हणून वापरतात. त्यातून निघणाऱ्या धुराचा लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यात प्रामुख्याने बांधकामात वापरलेले लाकूड, फर्निचर बनवणाऱ्यांकडून मिळालेले उरलेले लाकूड, जुने तुटलेले फर्निचर, सॅनमाईका-प्लायबोर्ड आदींचा वापर केला जातो. त्यामुळे यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषित वायू आणि धूर वातावरणात मिसळतो, त्याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

दररोज अंदाजे 50 ते 100 किलो लाकडाचा इंधन म्हणून वापर : छोट्या बेकरीमध्ये दररोज अंदाजे 50 ते 100 किलो लाकूड इंधन म्हणून वापरले जाते. तर मोठ्या बेकऱ्यांमध्ये अंदाजे 250 ते 300 किलो लाकूड वापरले जाते. 20 किलो मैद्याचा पाव तयार करण्यासाठी साधारण 5 किलो लाकडाची गरज भासते. भंगारातील निरुपयोगी लाकूड जाळल्याने त्यातून मिथेन, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, अस्थिर सेंद्रिय संयुगे यांसारखे आरोग्यास हानिकारक वायू बाहेर पडतात. त्यातून खोकला अन् श्वासनाचे आजार, अस्थमा असे गंभीर आजारदेखील होऊ शकतात. तसेच या धुरामुळे काही सूक्ष्मकण आपल्या फुफ्फुसांमध्ये अगदी आतपर्यंतदेखील पोहोचतात आणि त्याने कर्करोग, रक्तवाहिन्याशी संबंधित आजारदेखील होऊ शकतात, अशी माहिती पालिकेने दिली आहे.

आज इंधन लाकडाची किंमत 15 रुपये किलो :बाजारात जळाऊ लाकडं उपलब्ध असताना बेकरीत भंगारातील लाकडांचा वापर का केला जातो? असा प्रश्न आम्ही मुंबईतील एका बेकरी व्यावसायिकाला विचारला. नाव न सांगण्याच्या अटीवरून त्यानं सांगितलं की, इतर साधनांच्या तुलनेत भंगाराचे लाकूड स्वस्त पडते. बाजारात आज इंधन लाकडाची किंमत 15 रुपये किलो आहे. तर भंगार लाकडाची किंमत 5 रुपये किलो आहे. पालिकेने गॅस सिलिंडर आणि सीएनजीचे पर्यायदेखील दिलेत. पण व्यावसायिक सिलिंडर वापरल्यास त्याची किंमत 92.05 रुपये प्रति किलो जाते आणि CNG वापरल्यास त्याची किंमत प्रति किलो 58.78 रुपयांपर्यंत जाते. तेच आम्ही इलेक्ट्रिक भट्ट्या वापरल्यास प्रति युनिट 12 रुपये इतका खर्च येतो. या तुलनेत भंगारातील लाकूड परवडते.

निम्म्याहून अधिक बेकऱ्या अनधिकृत :महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईत सुमारे 1 हजार 200 बेकऱ्या असून, यातील निम्म्याहून अधिक बेकऱ्या अनधिकृत आहेत. 2007 पासून इलेक्ट्रिक आणि इतर CNG भट्ट्या वापरण्याच्या अटीवर 560 बेकऱ्यांना परवानगी देण्यात आलीय. असे असतानादेखील निम्म्याहून अधिक बेकऱ्यांमध्ये इंधन म्हणून भंगारातील लाकडाचा वापर केला जातो. त्यामुळे आता पालिकेने तब्बल 650 बेकरी व्यावसायिकांना नोटिसा पाठवल्या असून, वर्षभरात बेकऱ्यांमध्ये इंधन म्हणून शेगडी किंवा सीएनजीचा वापर न केल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिलाय. वर्षभरानंतरदेखील बेकरी चालकांनी आपल्या बेकरीतील भट्ट्यांमध्ये सुधारणा न केल्यास बेकऱ्या बंद केल्या जातील, असा इशारा पालिका प्रशासनाने दिलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details