मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आपल्या श्रद्धांजलीच्या पोस्टमध्ये दिवंगत पती आणि दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांच्यासह डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी झालेल्या वैयक्तिक भेटीची आठवण शेअर केली.
सायरा बानू यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी दिलीप कुमार यांच्यासह झालेल्या भेटीचा एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केला. या फोटोत मनमोहन सिंग यांची विनम्रता ठळकपणे दिसत आहे.
"मोठ्या हानीनंतरची शांतता आज शब्दांपेक्षाही मोठ्यानं बोलतेय," असं म्हणत सायरा बानू लिहितात, "डॉ. मनमोहन सिंग एक असे राजकारणी होते ज्यांची प्रतिष्ठा आणि सार्वजनिक सेवेची बांधिलकी एक युग परिभाषित करते, ते आम्हाला सोडून गेले. त्यांचा वारसा भारतीय इतिहासाच्या इतिहासात कोरला गेला आहे."
त्यांच्या भावनिक संदेशात, सायरा बानू यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी झालेल्या संवादाची आठवण करून दिली आणि त्यांच्या भेटीतील एका हृदयस्पर्शी क्षणाचं वर्णन केलं. "मला दिलीप साहेब आणि सुलतान भाई यांच्याबरोबर डॉ. मनमोहन सिंग यांच्या भेटीचा एक क्षण आठवतो. दिलीप साहेब कारमधून बाहेर पडताच, स्वतः मनमोहन सिंग यांना त्यांचे वैयक्तिकरीत्या स्वागत करण्यासाठी आलेले पाहून मी आश्चर्यचकित झाले होते.," असं त्यांनी शेअर केलं.
सायरा बानू यांनी मनमोहन सिंग यांच्या भेटीदरम्यान त्यांनी दाखवलेल्या औदर्याबद्दलची आठवण सांगितली. "नंतर जेव्हा आम्ही त्यांच्या चेंबरमध्ये प्रवेश केला तेव्हा एका छोट्या टेबलाभोवती फक्त एक खुर्ची होती जी आपल्याला फोटोमध्ये दिसत आहे. एका क्षणाचाही संकोच न करता डॉ. सिंग बाजूला सरकले, दुसरी खुर्ची उचलली आणि दिलीप साहेबांना देऊ केली. त्यांची ही कृती, आदराचा हा शांत हावभाव, त्या माणसाबद्दल खूप काही बोलून जाणारा होता," असं सायरा बानूंनी लिहिलंय.
डॉ. मनमोहन सिंग, यांचं वयाच्या 92 व्या वर्षी वयाच्या संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे निधन झालं. त्यांनी 2004 ते 2014 या काळात भारताचे पंतप्रधान म्हणून दोन वेळा काम केलं. आर्थिक सुधारणांच्या गंभीर काळात त्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं स्थिर राहून प्रगती केली. यामुळे त्यांना भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर मिळाला.