मुंबई - विधानसभा निवडणुकीत भाजपाने किंबहुना महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिलाय. या यशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी," एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है", अशा आशयाचे ट्विट केले आहे. यावरून विरोधकांची बोलती बंद झालीय. विशेष म्हणजे महायुतीच्या घवघवीत विजयानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवादही साधलाय. हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत. विरोधकांना जनतेने कृतीतून उत्तर दिले आहे. आम्ही सांगितले होते आम्ही अभिमन्यू आहोत आणि चक्रव्ह्यू आम्ही भेदला. विशेष करून मी लाडक्या बहिणींचे विशेष आभार मानतो ज्यांनी आम्हाला आशीर्वाद देऊन आमच्यावर विश्वास ठेवला. लोकसभेत फेक नरेटिव्ह पसरवला गेला होता, त्याला यंदाच्या निवडणुकीत जनतेने उत्तर दिले आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.
मुख्यमंत्रिपदाबाबत आमच्यात कुठलाही वाद नाही: राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार असे विचारले असता ते म्हणाल की, मुख्यमंत्रिपदाबाबत आमच्यात कुठलाही वाद नाही. हे आम्ही अगोदरच ठरवलेलं आहे की, निवडणुकीनंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जो काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील, असंही त्यांनी सांगितलंय.
लोकसभेचा वचपा काढला :राज्यात भाजपाने विधानसभा निवडणुकीचे घवघवीत यश संपादन केलंय. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, एक है तो सेफ है मोदी है तो मुमकीन है, अशा पद्धतीचं सूचक ट्विट केलंय. विशेषतः आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला मोठी हार पत्करावी लागली होती आणि त्याची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी उचलत राज्यातून पायउतार होण्याचं ठरवलं होतं. परंतु केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकत जी विधानसभेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. ती जबाबदारी अन् तो विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी सार्थ ठरवलाय. महाराष्ट्राने जो निकाल दिलाय, त्यावरून देवेंद्र फडणवीस हे फक्त राज्यातच नाही तर देशातही भाजपासाठी आता महत्त्वाचे नेते बनले आहेत.