मुंबई BJP Plan For Elections : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असताना दुसरीकडं भाजपा आमदारांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. विशेष करून महाराष्ट्रात महायुतीत असलेल्या भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन घटक पक्षांमुळं लोकसभा उमेदवार निश्चित करताना तिन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या नाकी नऊ आलं आहे. ही परिस्थिती विधानसभा निवडणुकीदरम्यान होऊ नये म्हणून भाजपानं नवीन फंडा अवलंबला आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातून जास्त मताधिक्य मिळेल त्या आमदाराचं तिकीट विधानसभेसाठी नक्की केलं जाणार आहे. या कारणास्तव विद्यमान आमदार आणि आमदारकीसाठी इच्छुक नेते कामाला लागले आहेत.
ज्याचा लीड जास्त तो 1 नंबर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये फूट पाडत शिवसेनेचे दोन गट तयार केले. तर दुसरीकडं अजित पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये फूट पाडत राष्ट्रवादीचे दोन गट तयार केले. अशात सर्वात जास्त आमदार असलेल्या भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. याच कारणास्तव महायुतीत लोकसभा जागा वाटपात असंख्य अडसर निर्माण झाले. अनेक विद्यमान खासदारांचे पत्ते कापले गेले तर नवख्या पक्षांतर केलेल्या नेत्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. ही परिस्थिती सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्भवू नये याकरता भाजपानं नवीन फंडा अवलंबला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवाराला चांगला लीड मिळेल त्या मतदारसंघातील आमदारालाच पुन्हा उमेदवारी देण्याचं निश्चित झालय. परंतु ज्या विधानसभा मतदारसंघात लीड मिळणार नाही, तेथील नेत्याची किंवा आमदाराची आमदारकी ही धोक्यात येणार आहे. भाजपानं यंदा लोकसभेसाठी अबकी बार महाराष्ट्रात 45 पारचा नारा दिला आहे. विशेष म्हणजे भाजपाने अवलंबलेला हा फंडा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी सुद्धा आहे लागू राहणार आहे. महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणामुळं संपूर्ण चित्र बदललं आहे. अनेक निष्ठावंत नेत्यांना, आमदार, खासदारांना निवडणुकीत विजयासाठी धोका जाणवू लागलाय. परंतु भाजपाच्या या नवीन फंड्यामुळं महायुती मधील नेते, आमदार आपल्या मतदार संघातील उमेदवाराला जास्त मताधिक्यानं जिंकून आणण्यासाठी जोरात कामाला लागले आहेत. यामध्ये कोण किती मताधिक्याने उमेदवाराला निवडून आणून सर्वात जास्त लीड देतो हे आता निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
उमेदवार आवडीचा असो किंवा नसो मात्र विजयी करणं महत्त्वाचं : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्यानं विजयी करण्यासाठी नव नवीन फंडे नेत्यांकडून अवलंबले जात आहेत. विशेष म्हणजे जागा वाटपावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये असलेली नाराजी दूर करायला बराच वेळ गेला आहे. आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त लीड घेण्यासाठी नेते आमदार प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये नेते आणि आमदारांनी दाखवलेले त्यांचे रिपोर्ट कार्डच त्यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी तारणहार ठरणार आहे. म्हणूनच लोकसभा उमेदवार निवडताना अनेक विधानसभा आमदारांनी ठराविक उमेदवारावरच जास्त आग्रह धरला. यात बऱ्याच ठिकाणी आमदारांना यश आलं असलं तरी सुद्धा अनेक ठिकाणी त्यांना नाराजीचा सामना ही करावा लागला आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये जो उमेदवार आहे. तो त्यांचा आवडता असो की नावडता, परंतु महायुतीत त्याला आपल्या विधानसभा मतदारसंघातून जास्त मताधिक्याने निवडून आणणे हे त्या मतदारसंघातील आमदाराचं व त्याचबरोबर नेत्याचं प्रमुख कर्तव्य असणार आहे.