नवी दिल्ली-अभिनेतासलमान खान हा वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहतो. रविवारी पहाटे पाच वाजता त्याच्या घराबाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्यानं मोठी खळबळ उडाली. वांद्रे पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातबिष्णोई गँगचा सहभाग असल्याचा मुंबईपाठोपाठ दिल्ली पोलिसांनाही संशय आहे. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर काही तासातच अनमोल बिष्णोईनं सोशल मीडियावर कथित पोस्ट करत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. हा फक्त ट्रेलर होता, अशी पोस्ट करत गँगस्टर अनमोलनं अभिनेता सलमान खानला पुन्हा हल्ला करण्याचा इशारा दिला. दिल्ली पोलिसातील सूत्राच्या माहितीनुसार दोघांपैकी एक संशयित हा गुरुग्रामधील आहे. त्याच्यावर खुनासह दरोडे टाकल्याचे विविध गुन्हे हरियाणामधील पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणारा संशयित आरोपी हा रोहित गोदाराच्या टोळीमधील आहे. रोहित गोदारा हा लॉरेन्स बिष्णोई, त्याचा भाऊ अनमोल आणि गोल्डी ब्रार यांच्या अत्यंत जवळचा आहे.
कोण आहे रोहित गोदारा?करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची राहत्या घरी ५ डिसेंबर २०२३ मध्ये हत्या केली होती. या हत्येची जबाबदारी रोहित गोदारानं घेतली होती. त्याचबरोबर हरियाणामधील स्क्रॅप व्यापारी सचिन गोदाच्या हत्येची जबाबदारी घतेली होती. रोहित गोदाराच्या वाढत्या गुन्हेगारीनं पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. कॅनडामध्ये राहून तो लॉरेन्सचा साथीदार गोल्डी ब्रारसाठी काम करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. गोदारा हा राजस्थानमधील बिकानेरच्या कपूरीसर गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर राजस्थानमध्ये खंडणीसह विविध प्रकरणात ३३ गुन्हे दाखल आहे. लॉरेन्सच्या इशाऱ्यावरून त्यानं सीकरमध्ये राजू ठेहट यांची हत्या केली होती. लॉरेन्स हा तुरुंगातून त्याचा भाऊ अनमोल आणि साथीदार रोहित यांच्याकडून टोळी चालवित असल्याचा आरोप आहे. लॉरेन्स तुरुंगात असूनही त्याची टोळी कार्यरत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस आणि एनआयएच्या टीमला या टोळीच्या गुन्हेगारी कृत्यावर पूर्णपणं अंकुश लावता आला नाही.