मुंबईKetaki Chitale :अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाते. अलीकडेच तिनं महाराष्ट्र सरकारवर टीका करणारा एक जोरदार व्हिडिओ शेअर केला आहे. देशात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. यावेळी तिनं विरोधकांवर टीका केली होती. यानंतर आता केतकीनं राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य शासनानं वक्फ बोर्डसाठी 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यावरून केतकीने राज्य सरकारला धारेवर धरलंय. 'तुम्ही स्वतः बधिर आहात, की आम्हाला बधिर करणार आहात', असा संतप्त सवाल तिनं उपस्थित केला आहे. तसंच लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान कसा असावा यासाठी आम्ही मतदान केलं. परंतु विधानसभा निवडणुकीत तीन तिघाडी आणि काम बिघाडी, अशी परिस्थिती निर्माण होणार असल्याचं तिनं म्हटलं आहे.
वक्फ बोर्डला खतपाणी :लोकसभा निवडणुकीत ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं नाही, त्यानाच तुम्ही मदत करत आहात. त्यांना बळकट करण्यासाठी तुम्ही दहा कोटी रुपये कसं काय मंजूर केले? असा सवाल केतकीनं राज्य सरकारला विचारला आहे. देशात वक्फ बोर्ड नको म्हणून देशात विविध ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. याच वक्फ बोर्डला तुम्ही कसं काय खतपाणी घालू शकता?. त्यांच्यासाठी कशी काय आर्थिक मदत करू शकता? अशी संतप्त भावना केतकीनं व्यक्त केलीय.
कोणता झेंडा घेऊ हाती? : तीन तिघाडी सरकारमध्ये आतापासूनच मतभेद असल्याचं दिसून येत आहे. विधानसभेत हे मोठ्या प्रमाणात दिसून येईल. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपण कोणाला मत द्यायचं?, कोणाला नाही? असा प्रश्न निर्माण होणार आहे. नोटाला मत देणं चुकीचं आहे. परंतु तुम्ही जर असंच वागणार असाल तर माझं मत शंभर टक्के नोटालाच असेल, असं केतकीनं म्हटलं आहे. तसंच विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोणता झेंडा घेऊ हाती? असा प्रश्न लोकांना पडणार आहे.