छत्रपती संभाजीनगर : नायलॉन मांजामुळं अनेक ठिकाणी अपघात होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. मांजावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असला तरी, म्हणावा तसा परिणाम होत नसल्याचं निदर्शनास येत आहे. मात्र, त्यावर जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन मुलांनी तोडगा काढला आहे. त्यांनी घरगुती जुगाड करून हेल्मेट तयार केलंय. ज्यामुळं पतंग कटल्यावर दुचाकीस्वाराच्या गळ्याला मांजाचा फास बसणार नाही आणि तो सुरक्षित राहील अशा पद्धतीची रचना त्यांनी केलीय. एका प्रदर्शनात त्यांनी अनोख्या हेल्मेटचं सादरीकरण केलं असून त्यांचं कौतुक होत आहे.
होणारे अपघात पाहून सुचली कल्पना : नोहेंबर महिन्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी पतंग उडवण्यासाठी सुरुवात केली जाते. छंद म्हणून अनेक जण पतंगबाजी करतात. त्यावेळी इतरांचा पतंग कापण्यासाठी जणू स्पर्धा केली जाते आणि त्यासाठी सर्वात धारदार मांजा वापरला जातो. आपला पतंग आकाशात झेपावत राहावा यासाठी प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर केला जातोय. त्यातून होणाऱ्या दुर्घटना पाहून अनेकांना यातना होतात, मात्र उपाय सापडत नाही. त्यातच सिल्क मिल्क कॉलनी येथील मनपा उर्दू शाळेतील आठवी वर्गात शकणाऱ्या दोन मुलांनी उपाय शोधून काढला आहे. अरहम सिद्दीकी आणि अजमत शेख अशी या मुलांची नावं असून सतत घडणाऱ्या अपघाताच्या घटना थांबवण्यासाठी प्रयत्न केल्याचं त्यांनी 'ईटीव्ही भारत' बोलताना सांगितलं.
असा केला जुगाड : वर्षातील चार महिने दुचाकी चालवताना मांजामुळं दुर्घटना घडण्याच्या घटना होतात. या घटना टाळण्यासाठी अरहम सिद्दीकी आणि अजमत शेख या विद्यार्थ्यांनी जुगाडू हेल्मेट तयार केलंय. या हेल्मेटमुळं कुठल्याही पद्धतीचा मांजा आपोआप बाजूला जाऊन कापला जाईल. ज्यामुळं दुचाकीस्वार आणि मागे असलेला सहप्रवासी सुरक्षित राहू शकतील. या दोन मुलांनी एक हेल्मेट घेतलं, त्याच्या बाहेरील बाजूस मध्यभागी एक ब्लेड लावलं. हेल्मेटच्या मध्य भागातून जाड लोखंडी तार लावण्यात आली, जी तार दुचाकीच्या हॅण्डलला अडकवायची आहे. याच्या वापरानं चेहऱ्यावर आलेला मांजा आपोआप हेल्मेटच्या वरच्या बाजूला सरकेल आणि लावण्यात आलेल्या ब्लेडमध्ये अडकून तो तुटून जाईन. अतिशय साध्या पद्धतीनं तयार केलेलं हेल्मेट जीव वाचवेल असा विश्वास अरहम सिद्दीकी आणि अजमत शेख यांनी व्यक्त केलाय.
घरच्या घरी तयार करा हेल्मेट : घरच्या घरी असलेल्या वस्तूंचा वापर करून हे हेल्मेट तयार करण्यात आलं आहे. त्यासाठी दोन ते तीनवेळा प्रात्यक्षिक घेण्यात आलं. प्रत्येकवेळी आलेल्या अडचणीत सुधारणा करत अखेर प्रयत्न यशस्वी झाला. शालेय प्रदर्शनात या हेल्मेटचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. त्यामध्ये घरीच आपण हे सुरक्षा हेल्मेट तयार करू शकतो याबाबत या विद्यार्थ्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर हातात हात मोजे, गळ्यात एक रुमाल ठेवल्यास आणखी सुरक्षा मिळू शकते अशी जनजागृती त्यांनी केली. या गंभीर समस्येवर उपाय सुचवल्यानं अनेकांनी त्यांचं कौतुक केलंय.
हेही वाचा -