कोल्हापूर- तुळशी विवाहानंतर लग्नसराईचे मंजूळ स्वर सर्वत्र घुमू लागलेत, घरात लग्न समारंभ म्हटल्यावर दाराला नारळी तोरण आणि वधू-वरांना बाशिंग, मुंडावळ्या आल्याच. लग्नात काळानुरूपे कितीही आधुनिकता आली असली तरी समाजातील अनेक कुटुंबीय परंपरेनुसार चालत आलेल्या जुन्या पद्धतीची बाशिंगे आणि मुंडावळ्या घेण्यासाठी दुकानांत गर्दी करीत असतात. आजही कोल्हापुरातील बाजार गेटमधील दुकानातूनच लग्नसराईचे साहित्य खरेदी केले जाते. अत्तार कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने बनवण्यात येणाऱ्या बाशिंग, मुंडावळ्या आणि नारळी तोरण विकण्याची परंपरा आजही कायम ठेवलीय. सध्या अत्तार कुटुंबीयांची चौथी पिढी हा व्यवसाय सांभाळत आहे.
नारळी तोरण बांधल्याशिवाय लग्नसराई सुरूच होत नाही : कोल्हापुरातील बाजार गेट परिसरात सर्व प्रकारच्या वस्तू होलसेल आणि रिटेलमध्ये मिळत असून, ही खूप मोठी बाजारपेठ आहे. याच बाजारपेठेत गेल्या 100 वर्षांपासून अत्तार कुटुंब लग्नसराईसाठी लागणाऱ्या साहित्यांसाठी ओळखलं जातं. चार चार पिढ्यांपासून ग्राहक जपलेल्या या कुटुंबाकडे आजही जुन्या पद्धतीची बाशिंग, नारळी तोरण आणि मुंडावळ्या मिळतात. तसेच ग्राहकांकडूनही त्याला चांगली मागणी आहे. सध्या लग्नसराईचा ट्रेंड जरी बदलला असला तरी अनेक कुटुंबांमध्ये जुन्या पद्धतीची बाशिंग आणि घराला साजेसे, असं डौलबाज नारळी तोरण बांधल्याशिवाय अनेक कुटुंबांच्या घरी लग्नसराई सुरूच होत नाही. खरं तर अत्तार कुटुंबातील गुलाबचंद्र अत्तार, अस्लम गुलाब अत्तार, अरिफ अत्तार, उरवा अत्तार अशा व्यक्तींकडून पिढीजात हा व्यवसाय सुरू असून, कोणत्याही शुभकार्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू अत्तार कुटुंबीय कुशल पद्धतीने बनवत आहेत. बाजार गेटमधील 10X15च्या गाळ्यात त्यांचा हा वडिलोपार्जित व्यवसाय असून, तो 100 वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे आता नवी पिढीसुद्धा याच व्यवसायाकडे वळली असल्याचं अरिफ अत्तार यांनी सांगितलंय.
200 रुपयांपासून ते 8 हजारांपर्यंतची नारळी तोरणं : अत्तार यांच्याकडे मिळणारी डौलबाद नारळी तोरणं 200 रुपयांपासून ऑर्डरीप्रमाणे आठ हजार रुपयांपर्यंतची बनवून मिळतात, तर जुन्या प्रकारच्या बाशिंगांना मागणी चांगली आहे. मुंडावळ्या कुटुंबीय घरातच बनवतात, सर्व कुटुंब आणि कुटुंबातील सदस्य मिळून हा व्यवसाय करतात. होलसेल आणि रिटेल दोन्हीही प्रकारातील त्यांच्याकडे बनलेल्या वस्तूंना कर्नाटकातील बिजापूर ते मुंबई आणि सोलापूरपर्यंत मागणी आहे. सर्व खर्च वजा करून लग्नाच्या सीझनमध्ये महिन्याला किमान 50 हजारांचा व्यवसाय होत असल्याचेही अरिफ अत्तार म्हणालेत.
परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ : सध्याच्या लग्नसराईत झगमगाट आणि प्रचंड आधुनिकता पाहायला मिळते, मात्र अजूनही काही नववधू आणि वर परंपरागत बाशिंग आणि मुंडावळ्या लग्नात हव्यात, असा कुटुंबीयांसह त्यांचा हट्टहास असतो. अत्तार कुटुंबीयांनीही ग्राहकाची पसंती ओळखून जुन्या आणि नव्या रितीरिवाजाचा मिलाफ साधत गेली 100 वर्षं ग्राहकांना अखंड सेवा दिलीय. त्यामुळेच कोल्हापुरातील अनेक कुटुंब अत्तार यांच्याशी जोडली गेलीत, घरातील कोणत्याही शुभकार्याला अत्तार यांचेच नारळी तोरण हवे, यासाठी अनेक जण प्रतीक्षा करतात, यामुळे लग्नसराईत अत्तार कुटुंबीयांच्या घरीही 'लगीनघाई' पाहायला मिळते.
हेही वाचा :