पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा दोन दिवसांपूर्वी दिल्ली हायकोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तसंच अटकेपासून असलेलं संरक्षण देखील काढून घेतलं आहे. यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी या वाढल्या आहेत. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यातच आज पुणे पोलीस बाणेर येथे असलेल्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याची चर्चा आहे. पण पोलीस दलातील वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कोणतंही पथक तिथं गेलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.
पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी राहिलेल्या पूजा खेडकर यांनी कथितरित्या अपंग असलेलं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर तब्बल सहावेळा मेडिकल टेस्टला बोलावून देखील गैरहजर राहिल्या. एवढंच नव्हे तर मोठी संपत्ती असताना देखील आयएएससाठी दिलेलं नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र दिलं. असं एक एक प्रकरण आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बाबतीत समोर आल्यावर आयोगानं प्रशासकीय सेवेतून निवड रद्द केली होती. आयोगानं दिलेल्या तक्रारीवरून दिल्ली क्राईम ब्रॅंचनं त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवून घेतली होती. त्यानंतर खेडकर यांनी पटियाला कोर्टात अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचा तो अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयातील धाव घेतली आणि दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा देखील अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
आज पुणे पोलीस पूजा खेडकर यांच्या घरी गेल्याची चर्चा होत असताना याबाबत पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, अशी कुठलीही कारवाई पुणे पोलिसांकडून करण्यात आली नसल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र असं असलं तरी पूजा खेडकर यांच्या अडचणी या वाढल्या असून त्यांना कधीही अटक होऊ शकते.