नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अनेकवेळा उपोषण करून आंदोलन केलं. मात्र, आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. "आतापर्यंत त्यांनी दुसऱ्यावर ढकलले, पण आता ते आरक्षण देतात की नाही हे समजेल. आता खरी मजा आहे. हिशोब चुकता करण्याची", असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना (CM Devendra Fadnavis) उद्देशून केलं होतं. यावेळी जरांगे यांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलंय.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? : पहिली गोष्ट तर हा मजा घेण्याचा प्रश्न नाही. यावर मजा काय आली पाहिजे? हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आम्ही या प्रश्नावर पहिल्या दिवसापासून गंभीर आहोत. या विषयावर माझ्या, अजित पवार आणि एकनाथ शिंदे तिघांच्या भूमिकेत कुठलंही अंतर नाही. जे निर्णय घेतले आहेत ते तिघांनी मिळून घेतले आहेत. पुढेही जे निर्णय घेऊ ते तिघे मिळून घेऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
परभणी आणि बीडमधील घटनेवर काय म्हणाले फडणवीस? : परभणीमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. एखाद्या घटनेचं गांभीर्य तिथे कोण गेला आहे, त्यापेक्षा आपण त्याला कसं रिस्पॉन्स करतो यावरून ठरतं. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जावं असं होत नाही. घटना महत्त्वाची होती म्हणूनच उपमुख्यमंत्री अजित पवार त्या ठिकाणी गेले होते. तसंच बीडमध्ये आम्ही कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
नक्षलवाद आता सर्वात निचांकी पातळीवर : 2014 मध्ये मुख्यमंत्री झालो, तेव्हा माझ्या क्षमतेबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली. आजवर मंत्रीही न झालेला हा काय करेल अशी शंका होती. पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना वाटायचं विदर्भावर अन्याय झाला, असा सतत म्हणणारा फडणवीस आपल्यावर अन्याय करेल का?, मात्र असं काहीही झालं नाही. विदर्भाला आपण न्याय दिला. उर्वरित महाराष्ट्रावरही अन्याय होऊ दिला नाही. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा सर्व भागातील प्रकल्प आपण पूर्ण केले आहेत. सहा नदीजोड प्रकल्प आपण हाती घेतले आहेत. हे सहा नदीजोड प्रकल्प महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन करतील. गडचिरोली भविष्याची देशाची स्टील सिटी होणार आहे. नक्षलवाद आता सर्वात निचांकी पातळीवर आहे. आता नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी आपण दक्षिण गडचिरोलीच्या जास्त डीप क्षेत्रात जात आहोत अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
अवैध होर्डिंग : होर्डिंग संदर्भात उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रात आपण चांगल्या पद्धतीने निर्देश पाळतो. मात्र अनेक वेळेला कार्यकर्ते उत्साहाच्या भरात अवैध होर्डिंग लावतात. आमच्याही कार्यकर्त्यांनी तसे होर्डिंग लावले होते. मी ते काढायला लावले. उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे महाराष्ट्रात पालन व्हावे यासाठी प्रयत्न करू असं फडणवीस म्हणाले.
कल्याण अत्याचार घटना : दुर्दैवाने समाजामध्ये या घटना घडताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणजे न्यायव्यवस्थेने वेगाने न्याय देणे आणि दुसरीकडं समाजात जागृती होणं आवश्यक आहे. 95 टक्के घटना नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींकडून होतात. हाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच. मात्र आता हा सामाजिक प्रश्नही झालेला आहे. समाजात महिला आणि मुलींबद्दल संवेदनशीलता येणे आवश्यक असल्याचं फडणवीस म्हणाले.
फडणवीस, शरद पवार वारंवार मुख्यमंत्री होणे याबद्दल तुलनेचा प्रश्न : दोघांची आपापली राजकारणाची स्टाईल आहे. माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू सकारात्मकता आहे. सर्व क्षेत्रात सकारात्मकतेने काम करण्याचा माझा प्रयत्न असतो. अनेक वेळेला त्यात अडथळे येतात. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो आणि आता पुन्हा मुख्यमंत्री झालो यात फरक म्हणजे अनुभवातून आपण शहाणे होतो. चूक होते म्हणून निर्णयच करू नये असं नाही तर धाडसाने निर्णय घेतले पाहिजे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा -
बीडमधील एक आरोपी मंत्रिमंडळात; एडिट आणि क्रेडिटचा फंडा आमच्याकडे नाही, संजय राऊतांचं टीकास्त्र