बीड : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्याच अनुषंगानं बीड जिल्ह्यात पोलीस प्रशासन पिस्तूल बाळगणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात 1281 पिस्तूलधारक आहेत. त्यामुळं बीड जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
पिस्तूल परवानाधारकांची संख्या 1281 : जिल्ह्यात ज्याच्या नावे लायसेन्स आहे ते नागरिक पिस्तूल वापरत नाहीत तर, त्यांच्या घरातील तरुण या पिस्तूलचा वापर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही तरुणांचे हवेत गोळीबार करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहेत. यामुळं बीड जिल्ह्यात दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र परवानाधारकांची संख्या जरी 1281 असली तरी, अवैध विनापरवाना किती पिस्तूल असतील याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नवनीत कॉवत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक : मस्साजोग येथील झालेल्या घटनेमुळं बीड जिल्ह्यात अशांतता आहे. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दररोज वेगवेगळे पुरावे सापडत आहेत. या प्रकरणामुळं पूर्वीचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर नवनीत कॉवत हे आता बीड जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक आहेत. कॉवत हे एक धडाकेबाज पोलीस अधिकारी असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं परवानाधारक पिस्तूल बाळगणाऱ्या नागरिकांवर आणि विनापरवाना पिस्तूल वापरणाऱ्या नागरिकांना कसा धाक बसतो, याकडं आता सर्व जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त अर्ज फेटाळले : जिल्हाभरातून आलेल्या अर्जातून एकट्या परळी तालुक्याचे 55 अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती, उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली. शस्त्र परवाना मिळावा यासाठी जिल्हाभरातून आलेल्या अर्जात परळी तालुक्यातील 55 जणांचा समावेश आहे. उर्वरित 10 तालुक्यांतून 240 अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात अंतिम मंजुरीसाठी गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित होते. यावर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी निर्णय घेतला नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी एकालाही परवाना न देता सर्वच अर्ज फेटाळून लावले आहेत.
245 परवानाधारकांवर गुन्हे दाखल : जिल्ह्यातील 1 हजार 281 पिस्तूल परवानाधारकापैकी 245 जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र तरीही त्यांच्याकडं शस्त्र परवाना आहे. गुन्हे नोंद असलेल्यांचा परवाना रद्द करावा यासाठी पोलीस प्रशासनाने गेल्या काही दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडं प्रस्ताव पाठवलेला होता. यावर अद्याप कारवाई झालेली नाही.
काही नागरिकांचे अर्ज का फेटाळले : बीड जिल्ह्यातील काही नागरिकांनी शस्त्र परवान्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातून आलेल्या अंतीम मंजूरीसाठीच्या अर्जाची पडताळणी केली असता, अर्ज करणाऱ्या काही संबधितांना शस्त्र परवाना देण्याची गरज वाटली नाही. त्यामुळं 295 शस्त्र परवाना प्रस्ताव विविध कारणांमुळं नामंजूर करण्यात आल्याची माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली.
हेही वाचा -