बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे (Santosh Deshmukh Murder Case) आणि वाल्मिक कराड संदर्भातील बातम्यांचे व्हिडिओ पाहात असल्याच्या रागातून दोघांनी अशोक मोहिते या तरुणाला मारहाण केल्याची घटना धारूर तालुक्यातील तरनळी गावात घडली होती. या घटनेत अशोक मोहिते गंभीर जखमी झाला होता. तर, मारहाण करणारे कृष्णा आंधळे याचे मित्र वैद्यनाथ बांगर (Vaidyanath Bangar) आणि सिद्धेश्वर सानप (Siddheshwar Sanap) हे दोघंही फरार झाले होते. धारुर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथकं तयार केली होती. त्यानंतर आता आरोपींना कर्नाटकमधून अटक करण्यात आलीय.
नेमकं काय घडलं? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र सिद्धेश्वर सानप आणि वैद्यनाथ बांगर यांनी अशोक मोहिते या तरुणाला बुधवारी (5 फेब्रुवारी) बेदम मारहाण केली. फरार असलेला कृष्णा आंधळेचा बुधवारी वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाचं स्टेटस आंधळेच्या मित्रांनी ठेवलं होतं. मात्र, अशोक मोहिते हा तरुण वाल्मिक कराडच्या बातम्या मोबाईलवर पाहत असल्यानं आंधळेच्या मित्रांना संताप आला. त्यांनी मोहितेला काठीनं बेदम मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर अशोक मोहिते याच्यावर सध्या लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कृष्णा आंधळेच्या मित्रांची चौकशी सुरू : अटक करण्यात आलेल्या सिद्धेश्वर सानप आणि वैद्यनाथ बांगर यांची सध्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं चौकशी सुरू आहे. या चौकशीतून कृष्णा आंधळे कुठे आहे? याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नार्कोटेस्ट करा : दुसरीकडं वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी यांची नार्को टेस्ट करा, त्यातून बरंच काही बाहेर येईल, अशी मागणी करत भाजपा आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा सरपंच संतोष देशमुख हल्ल्याप्रकरणी भाष्य करत गंभीर आरोप केलेत. दोन महिने उलटले तरी कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे. किंबहुना अशोक मोहितेंवर हल्ला करणारेही याच टोळीचे सहकारी आहेत, असा दावाही सुरेश धस यांनी केलाय.
हेही वाचा -