पुणे : राज्यात टीईटी तसंच शिक्षक भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याबाबत आपल्याला माहिती असेलच. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. बनावट आदेश तयार करून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शाळांमधील कला शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीचा लाभ मिळवून देणाऱ्या दलालाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केली दलालाला अटक : या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं डॉ. दीपक चांदणे या दलालाला अटक केली आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कार्यालयात हा प्रकार घडला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्थेत शिक्षण विभागातील अतिरिक्त सचिवांची स्वाक्षरी असलेला बनावट जीआर तयार करून संस्थेच्या माध्यमिक शाळांमधील ५० पदवीधर नसलेल्या कला शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ मिळवून देण्याचा प्रकार या दलालानं केला.
बनावट जीआरद्वारे शिक्षकांना वाढीव वेतन देण्याचा प्रयत्न : याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे म्हणाले की, "डिप्लोमा धारक कला शिक्षकांना वाढीव वेतनश्रेणी मिळण्याबाबत एक आदेश तयार करण्यात आला होता. तो निर्णय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना सादर केला. याबाबत शंका आल्यावर त्यांनी हे प्रकरण पुणे एसीबीकडं चौकशीसाठी दिलं. यावेळी आमच्या लक्षात आलं की, हा बनावट जीआर असून याद्वारे ५० शिक्षकांना वाढीव वेतन देण्याचा प्रयत्न झाला आहे."
बनावट जीआरसाठी घेतले लाखो रुपये : बनावट जीआर बनवून शिक्षकांना वाढीव वेतन देण्यासाठी त्यानं प्रत्येक शिक्षकाकडून ३० हजार रुपये घेतल्याचं समोर आलं आहे. आरोपी डॉ. दीपक चांदणे यानं शिक्षण विभागामध्ये ओळख असल्याचं पदवीधर नसलेल्या शिक्षकांना भासवलं. यानंतर शासनाकडून आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या हेतूनं त्यानं अन्य आरोपींच्या मदतीनं शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे अतिरिक्त सचिव प्रवीण मुंढे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करत बनावट जीआर तयार केला. प्राथमिक तपासात आरोपीनं शिक्षकांकडून एकूण १७ लाख रुपये घेतल्याचं समोर आलं आहे.
अजून तपास सुरू : याबाबत शिक्षण उपसंचालक हारून आत्तार म्हणाले, "या प्रकरणाबाबत शिक्षण आयुक्तांनी एक समिती स्थापन केली आहे. या समितीनं एक अहवाल तयार केला असून तो अहवाल आम्ही एसीबीला दिला आहे. त्यानुसार तपास होत आहे."
हेही वाचा :