मुंबई : ऑस्कर नामांकित इंडो-अमेरिकन लघुपट 'अनुजा' 5 फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला 97व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन लघुपट श्रेणीसाठी नामांकन मिळालं आहे. 22 मिनिटांच्या या लघुपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. दुसरीकडे, चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे की, अनुजा तिच्या भविष्याबाबत काय निर्णय घेते. ती बोर्डिंग स्कूलची परीक्षा द्यायला जाते की, तिच्या बहिणीच्या भविष्याचा विचार करते. अनुजाचा क्लायमॅक्स काय आहे याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
- चित्रपटाचे नाव अनुजा
- कलाकार : सजदा पठान, अनन्या शानबाग, नागेश भोंसले, गुलशन वालिया
- दिग्दर्शक: एडम जे. ग्रेव्स
- निर्माती गुनीत मुंगा, प्रियांका चोप्रा, सुचित्रा मित्तल
- रन टाईम 22 मिनिटे
'अनुजा'ची कहाणी काय आहे? : 'अनुजा' चित्रपटात एका 9 वर्षांच्या मुलीची कहाणी दाखविण्यात आली आहे, जी अनाथ आहे आणि तिच्या मोठ्या बहिणीबरोबर राहते. दोन्ही बहिणी कापडाच्या कारखान्यात शिवणकाम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. 'अनुजा' शिक्षणात खूप हुशार आहे आणि तिला तिचे नशीब बदलण्याची मोठी संधी मिळते, बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश, ज्यासाठी तिला परीक्षा द्यावी लागत असते. पण कारखाना मालक तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत, तिला धमकी देतो की, जर ती परीक्षा द्यायला गेली तर तो तिला आणि तिच्या बहिणीला नोकरीवरून काढून टाकेल. हे ऐकून 'अनुजा' घाबरते आणि तिच्या बहिणीला विचारते की, बोर्डिंग स्कूल म्हणजे काय? तिची बहीण तिच्याबरोबर तिथे राहू शकेल का? यावर अनुजाची बहीण म्हणते की, तिला या सर्व गोष्टींबद्दल काळजी करण्याची गरज नाही. तिला फक्त तिच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. परीक्षेच्या दिवशी अनुजा घराबाहेर पडते आणि वाटेत विचार करत राहते. यावेळी तिला तिची बहीण भिंतीच्या मागे लपून कारखान्यात प्रवेश करताना दिसते आणि चित्रपट तिथेच संपतो. आता अनुजा पुढे काय निर्णय घेईल, ती परीक्षेला जाणार की नाही? चला तर मग याचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
- 'अनुजा' चित्रपटाचे दोन पैलू
1 अनुजाचे नशीब बदलते का? : या कथेचा शेवट प्रेक्षकांना काय वाटते ते ठरवायचे आहे. यातून एक पैलू समोर येतो, ते म्हणजे 'अनुजा' ही परीक्षा देण्यासाठी गेली होती. हे सांगण्यामागे दोन कारणे आहेत, पहिले म्हणजे, अनुजाची बहीण चित्रपटाच्या सुरुवातीला एक कथा सांगते, ज्यामध्ये एका निःस्वार्थ मुंगूसाचा मृत्यू होतो. गोष्ट अशी आहे की, एक जोडपे त्यांच्या मुलाला घरी एका पाळीव मुंगूसाच्या देखरेखीखाली सोडतात. जेव्हा ते परत येतात तेव्हा मुलाच्या वडिलांना मुंगूसाच्या तोंडावर रक्त दिसते. यानंतर ते वडील मुंगूसाला मारतात, कारण त्याला वाटते की मुंगूसानं त्याच्या मुलाला मारले असेल. पण जेव्हा त्याची पत्नी आत जाते आणि पाहते तेव्हा परिस्थिती वेगळी असते, कारण प्रत्यक्षात मुंगूसानं सापाला मारले असते, जो मुलाचा जीव घेऊ शकणार असतो. 'अनुजा' या कहाणीनं प्रेरित होते आणि तिचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी परीक्षा देण्याचा निर्णय घेते. दुसरे कारण म्हणजे अनुजाची भूमिका साकारणारी सजदा पठान देखील एनजीओ सोडल्यानंतर अभिनेत्री बनली आहे. निर्मात्यांनी ही कहाणी चित्रपटात गुंतवली आहे. कारण सजदा देखील बालकामगार होती, जिला सलाम बालक ट्रस्टनं वाचवलं होतं. या ट्रस्टच्या सहकार्यानं हा चित्रपट बनवण्यात आला आहे.
2 'अनुजा'ची कहाणी खूप भावनिक : चित्रपटाच्या कथेचा दुसरा पैलू म्हणजे, अनुजा परीक्षा देण्यासाठी जात नाही. कारण चित्रपटात अनुजा आणि तिच्या बहिणीमधील खोल नाते दाखवले आहे. एका दृश्यात, अनुजा तिच्या बहिणीला वर्तमानपत्रात प्रकाशित झालेली लग्नाची जाहिरात वाचून दाखवते. ज्यामध्ये असं लिहिलं आहे की, मुलींनी महत्त्वाकांक्षी असू नये. यावर तिची बहीण म्हणते की, जर मुलगी महत्वाकांक्षी नसेल तर कोण असेल? दरम्यान अनुजाच्या परीक्षेची फी 400 रुपये आहे आणि तिची बहीण दररोज कारखान्यातून एक बॅग चोरते आणि दोन्ही बहिणी परीक्षेची फी गोळा करण्यासाठी ती बॅग बाजारात विकतात. अनुजाला माहित आहे की तिची बहीण तिच्यासाठी किती काम करत आहे. जेव्हा तिला कळते की, तिची बहीण बोर्डिंग स्कूलमध्ये तिच्याबरोबर राहणार नाही, तेव्हा अनुजाचं मन दुखतं. दुसरीकडे, 'अनुजा'ला योग्य मार्ग दाखविणारा आणि समजावून सांगणारा कोणीही नाही, ज्यामुळे तिला तिचे उज्ज्वल भविष्य दिसत नाही आणि ती परीक्षा न देण्याचा निर्णय घेते. 'अनुजा'ची कहाणी खूप भावनिक आणि मन जिंकणारी आहे. अनुजाची भूमिका साकारणाऱ्या सजदाची कहाणी खऱ्या आयुष्यातही खूप प्रेरणादायी आहे. बालमजुरीतून वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ऑस्कर नामांकन मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे.
हेही वाचा :