भुसावळ :गेल्या काही दिवसांपासून राज्यासह जळगाव जिल्ह्यात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. त्यातच आता भुसावळमध्ये (Bhusawal Murder) एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. खडका रोड परिसरात एका तरुणाची गोळीबार करून हत्या करण्यात आलीय. तेहरीन नासीर शेख असं मृत तरुणाचं नाव असून या घटनेमुळं भुसावळमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं? :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात असलेल्या अमरदीप टॉकीज जवळील चहाच्या दुकानात (डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहा) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तीन ते चार अज्ञातांनी तेहरीन शेख या तरुणावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. तेहरीन हा आज सकाळी सातवाजेच्या सुमारास चहा पिण्यासाठी आला होता. थोड्यावेळानंतर दोन अज्ञात दुचाकींवर तोंडाला रुमाल बांधून काही जण आले. त्यातील चारजण दुकानात शिरले. यावेळी त्यातील चार संशयितांपैकी तिघांनी आपल्याकडील गावठी पिस्तूलातून तेहरीनवर पाच गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनं दुकानातील ग्राहकांमध्ये पळापळ झाली, तर काही क्षणात संशयीत आरोपी दुचाकीवरून पसार झाले.