मुंबई Vande Bharat Sleeper Express:बुलेट ट्रेन प्रमाणं वंदे भारत एक्सप्रेस देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं बोललं जातंय. आज देशातील प्रत्येक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना, पर्यटन क्षेत्रांसह महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या 100 वंदे भारत एक्सप्रेसचं जाळं तयार झालं आहे. मात्र, या सर्व गाड्या चेअरकार असल्यानं या गाड्या आतापर्यंत शॉर्ट डिस्टन्सवर चालवल्या जात आहेत. वंदे भारत 'एक्सप्रेस'ला नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळं आता देशात लवकरच वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये स्लीपर कोच असावा, अशी मागणी नागरिक करत होते. त्या अनुषंगानं चेन्नई येथील कारखान्यात स्लीपर कोचचं काम सुरू झालंय. त्यामुळं येत्या दोन महिन्यात देशातील पहिली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
स्लीपर एक्सप्रेस दोन महिन्यात प्रवाशांच्या सेवेत :पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस येत्या दोन महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. ऑगस्ट महिन्यात या गाडीची पहिली चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीत गाडी यशस्वी झाल्यानंतरच देशातील पहिली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस मुंबई ते दिल्ली मार्गावर धावणार आहे. या संदर्भात सध्या रेल्वे बोर्ड नियोजन करत असून, सध्या या गाडीच्या इतर चाचण्या, परीक्षण सुरू आहे. या गाडीची सर्व तांत्रिक कामं अंतिम टप्प्यात आहेत. या गाडीची बांधणी उच्च दर्जाची ऑस्टेनिटिक स्टेनलेस स्टीलची असून, यात क्रॅश बफर, कप्लर्समध्ये क्रॅशयोग्य घटक समाविष्ट असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे.
BHEL 72 महिन्यांत 80 गाड्या पुरवणार :मागील वर्षी म्हणजे 2023 मध्ये, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच BHEL च्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमला 80 स्लीपर क्लास वंदे भारत गाड्यांचं कंत्राट मिळालं होतं. या कराराची एकूण किंमत 9 हजार 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सोबतच 35 वर्षांसाठी देखभालीचा करारही करण्यात आला आहे. BHEL 72 महिन्यांत 80 गाड्या पुरवणार आहे. कंसोर्टियम ICF चेन्नई येथील उत्पादन युनिट तसंच भारतीय रेल्वेनं नियुक्त केलेल्या दोन डेपोमध्ये या गाड्यांचे अपग्रेड, ऑपरेटची देखरेख करण्यात येणार आहे.
ऑगस्ट महिन्यात पहिली चाचणी :मेक इन इंडिया या प्रकल्पांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी बनावटीच्या वंदे भारत या हाई स्पीड एक्सप्रेसची सुरुवात केलीय. आज संपूर्ण देशभरात 100 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. या सर्व गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच हिरवा झेंडा दाखवला आहे. सध्या धावत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस या 16 डब्यांच्या असून काही ठिकाणी आठ डब्यांच्या गाड्या चालवल्या जात आहेत. मात्र, या गाड्या चेअरकार असल्यानं कमी अंतरावर चालवण्यात येत आहेत. त्यामुळं या गाड्यांचा पल्ला वाढवण्यासाठी वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या या गाडीच्या स्लीपर डब्यांची निर्मिती चेन्नई येथील इंटेग्रल कारखान्यात होत असून, याचं काम जवळपास अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळं येत्या ऑगस्ट महिन्यात या गाडीची पहिली चाचणी घेण्यात येणार आहे'.