छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Mountain climbers :360 एक्सप्लोररमार्फत 15 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं आशिया खंडातील सर्वोच्च शिखर 'माऊंट एल्ब्रूस' बेस कॅम्पवर गिर्यारोहकांनी तिरंगा फडकवून राष्ट्रीय उत्सव साजरा केला. गिर्यारोहक आनंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील या टीमनं भारतीय राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गायलं. टीममध्ये छत्रपती संभाजीनगर येथून दत्ता सरोदे, प्रशांत काळे, किशोर नवकर, विनोद विभुते, सुरज सुलाने, रुपाली कचरे, मैसूर येथील प्रीत केएस, लातूर येथील अजय गायकवाड, सोलापूर मधील आनंद बनसोडे, मध्यप्रदेश येथील चेतन परमार आणि 12 वर्षीय प्रीती सिंग यांचा समावेश होता.
रशियातून मोहिमेला सुरुवात :छत्रपती संभाजीनगर शहरातील सहा गिर्यारोहकांनी या अनोख्या मोहिमेत सहभाग घेतला. 8 ऑगस्ट रोजी युवक आशिया खंडातील सर्वात उंच शिखर 'माऊंट एल्ब्रूस' सर करण्यासाठी रवाना झाले. 11 ऑगस्ट रोजी रशिया येथून त्यांनी मोहिमेला सुरुवात केली. पाच दिवस गिर्यारोहण करत 18 हजार 510 फूट म्हणजेच 5 हजार 642 मीटर अंतर कापलं. मात्र वातावरण खराब असल्यानं शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांना पोहोचता आलं नाही. बेस कॅम्पवर पोहचताच सर्व गिर्यारोहकांनी देशाचा तिरंगा ध्वज हातात घेत 'भारत माता की जय' असा जयघोष केला. तसंच राष्ट्रगीत म्हणून स्वतंत्रता दिवस साजरा केला. तर ही मोहीम फत्ते करणारे महाराष्ट्रातील पहिलेच गिर्यारोहक ठरले असल्याचा दावा या गिर्यारोहकांनी केलाय. बेस कॅम्पवर त्यांनी महाराष्ट्र गीत गायलं. 16 ऑगस्ट रोजी पुढील अंतिम टप्पा पूर्ण करण्यास सुरू केल्याची माहिती गिर्यारोहक डॉ. प्रशांत काळे यांनी 'ई टीव्ही भारत'ला दिली.