मुंबई-रत्नागिरीत शिवसेना (ठाकरे) पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडलीय. या बैठकीत आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झालीय, असं म्हटलं होतं. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, यानंतर भास्कर जाधव शिंदे गटात प्रवेश करणार का? असा चर्चा राजकीय वर्तुळात झाल्या होत्या. आता या व्हिडीओवर स्वत: आमदार भास्कर जाधव यांनीच खुलासा केलाय. मी जेव्हा माझी भूमिका मांडली आहे. एखादं भाष्य केलं असेल तर ते मी मागे घेत नाही, मी त्या वक्तव्याचा खुलासा करीत नाही. पण आमची ही बैठक खासगी होती. मग बैठकीतील हा व्हिडीओ बाहेर गेला कसा? असा सवाल आमदार भास्कर जाधवांनी उपस्थित केलाय.
चुकीचं काही बोललो नाही :पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, मला आश्चर्य वाटतंय की, आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. त्यात जे मी खासगीत बोललं पाहिजे ते बोललो. आणि त्यात काही चुकीचं नाहीये. खासगीमध्ये झालेल्या बैठकीची क्लिप व्हायरल झाली कशी? आणि ही क्लिप मीडियापर्यंत गेली कशी? याचा अर्थ जबाबदार पदाधिकारी जबाबदारीने वागतात का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. आपण जबाबदार पदाधिकारी नाही हे त्या पदाधिकाऱ्यांनी सिद्ध केलंय, असं भास्कर जाधव म्हणालेत.
मूळ क्लिप कट केली :मी ऑडिओ ऐकलेली आहे. शिवसेनेची काँग्रेस होतेय, तेवढंच व्हायरल झालंय आणि त्यानंतर मी काय बोललो किंवा त्याआधी काय बोललो, हे व्हिडीओत दाखवलं नाही. क्लिप तिथेच कट केलीय. माझं म्हणणं मी मांडलंय आणि ते शब्द मी मागे घेत नाही. माझी भूमिका रोखठोक असते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाची काँग्रेस झालीय, असं मी म्हटलं. मी पुढं काय बोललोय तेसुद्धा दाखवलं पाहिजे. दरम्यान, संजय राऊत आणि विनायक राऊत काय बोलले मी ऐकलं नाही. पक्षात सुधारणा होण्यासाठी आणि पक्षात काही बदल होण्याकरिता मी बोललो आहे आणि त्याचं स्वागत होईल. पक्ष अडचणीत आहे, असं म्हणण्याचं कारण नाही आणि जर पक्ष अडचणीत असेल तर तो बाहेर काढण्याकरिता काही ठोस भूमिका घेतली पाहिजे. काही संकटांना आपण सामोरे गेले पाहिजे. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी माझी जबाबदारी काल पार पाडली, असं भास्कर जाधवांनी अधोरेखित केलंय.
आमदार भास्कर जाधव (Source- ETV Bharat) वेळकाढूपणा सुरू आहे :संतोष देशमुख हत्या प्रकरणात वेळकाढूपणा सुरू आहे. दीडशे पोलीस अधिकारी नेमले गेले आणि ते स्वतः शरण आले, ते सगळं संशयास्पद आहे. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय. सरकारकडून वेळकाढूपणा सुरू आहे. मागणी केल्यानंतर मकोका लावण्यात आलाय. त्यामुळे सरकारची भूमिका संशयस्पद वाटते. सरकारच्या वृत्ती आणि कृतीबद्दल संशय निर्माण होत आहे, असं आमदार भास्कर जाधव म्हणालेत.
हेही वाचा -