ठाणे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये लढती कशा असतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गटाचे केदार दिघे विरुद्ध एकनाथ शिंदे आणि मनसेचे अभिजित पानसे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघांमध्ये फारसे उमेदवार नाहीत, मात्र ठाणे शहर मतदारसंघांमध्ये बंडखोरी होण्याची चिन्हं दिसत आहेत. भाजपाच्या संजय केळकर या विद्यमान आमदारापुढे मनसेचे अविनाश जाधव आणि उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे यांचे आव्हान असणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कशी असणार लढत? ठाणे शहरात सर्वाधिक बंडखोरीची चिन्हं - ASSEMBLY ELECTION 2024
ठाणे शहर मतदारसंघांमध्ये बंडखोरी होण्याची चिन्हं दिसत आहेत. भाजपाच्या संजय केळकर विद्यमान आमदारापुढे मनसेचे अविनाश जाधव व ठाकरे गटाचे राजन विचारे यांचे आव्हान असणार आहे.
![मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कशी असणार लढत? ठाणे शहरात सर्वाधिक बंडखोरीची चिन्हं eknath shinde and kedar dighe](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/23-10-2024/1200-675-22741647-thumbnail-16x9-kedareknath-65-aspera.jpg)
Published : Oct 23, 2024, 12:31 PM IST
काही उमेदवार अपक्ष लढण्याचीदेखील चिन्हं : ठाणे शहर मतदारसंघांमध्ये शिंदे गटातील दोघांनी बंडखोरी करण्याचं ठरवलंय. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यादेखील याच मतदारसंघामधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून, त्यासाठी त्यांनी फॉर्मदेखील घेतलेला आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाचे माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर हेदेखील बंडखोरी करणार असल्याचे दिसत आहे. भाजपामध्येदेखील बंडखोरी होण्याची चिन्हं असून, माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर हेदेखील निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. ओवळा-माजिवाडा मतदारसंघामधून प्रताप सरनाईक हे शिंदे गटाचे उमेदवार असतील, तर त्यांना संजीव नाईक यांच्याकडून आव्हान मिळणार आहे. तसेच काही उमेदवार अपक्ष लढण्याचीदेखील चिन्ह आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. हजारो कोटींचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघांमध्ये दिला असून, आजही या मतदारसंघांमध्ये अनेक मोठी विकासकामे सुरू आहेत. कळवा-मुंब्रा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे नजीब मुल्ला हे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देणार आहेत. मुस्लिमबहुल समजला जाणारा हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी एमआयएम आणि समाजवादी पार्टी, बहुजन वंचित आघाडी, असे पक्षदेखील निवडणूक लढणार आहेत. या मतदारसंघांमध्ये शिंदे गटाचे नगरसेवक राजन किने हेदेखील निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत. ते मुंब्रा विकास आघाडी या नावाने अपक्ष लढण्याची शक्यता आहे.
सर्वात जास्त उमेदवार ठाणे शहरात :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघांमध्ये सर्वात कमी उमेदवार असण्याची चिन्ह आहेत, तर ठाणे शहर मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार असणार आहेत. भाजपाचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या पक्षामध्येदेखील कलह सुरू असून, या ठिकाणावरून भाजपाचे संजय वाघुले हेदेखील इच्छुक आहेत. तसेच भाजपाचे मिलिंद पाटणकर हेदेखील बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. शिंदे गटाच्या दोन इच्छुकांनादेखील ठाणे शहर मतदारसंघातून निवडणूक लढायची आहे. या सर्व कारणांमुळे ठाणे शहर मतदारसंघामध्ये सर्वाधिक उमेदवार उभे राहण्याची चिन्ह दिसत आहेत.
राज ठाकरे-शरद पवार येणार ठाण्यात : गुरुवारी एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अविनाश जाधव हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, त्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. तसेच तिन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. जितेंद्र आव्हाड यांचा अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः शरद पवार उपस्थित राहणार असून, मनसेचे प्रमुख राज ठाकरे हेदेखील अविनाश जाधव यांचा अर्ज भरण्यासाठी ठाण्यात येणार आहेत. तसेच यावेळी मनसेकडूनदेखील शक्तिप्रदर्शन होणार आहे.
हेही वाचा-