महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यंदा होळीच्या टिमक्यांवर राजकीय पक्षांची नावे; मतदान करण्याचं आवाहन करणारा संदेशही रेखाटला - Holi 2024 - HOLI 2024

Holi 2024 : होळीचा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलाय. त्यातच सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणघुमाळी सुरु आहे. त्यामुळं यंदा होळीच्या टिमक्यांवर आता राजकीय पक्षांची नावं झळकू लागली आहेत. तसंच मतदान करा असा संदेश रेखाटण्यात आलाय.

यंदा होळीच्या टिमक्यांवर राजकीय पक्षांची नावे; मतदान करण्याच आवाहन करणारा संदेशही रेखाटला
यंदा होळीच्या टिमक्यांवर राजकीय पक्षांची नावे; मतदान करण्याच आवाहन करणारा संदेशही रेखाटला

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 11:43 AM IST

यंदा होळीच्या टिमक्यांवर राजकीय पक्षांची नावे

येवला (नाशिक) Holi 2024 : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आता सणाला देखील पक्षांची चिन्हं आणि नावं पाहायला मिळत आहेत. होळी सण असल्यानं टिमक्यांवर आता राजकीय पक्षांची नावं झळकू लागली आहेत. तसंच मतदान करा असा संदेश रेखाटण्यात आलाय.

टिमक्यांवर राजकीय पक्षांची नावे : होळी सणासाठी लागणारी टिमकी बनवण्याची लगबग सध्या येवला शहरात सुरु असून 25 ते 30 टक्क्यांनी टिमक्यांच्या किमतीत वाढ झालीय. होळी सणाच्या दिवशी होळी पुढं टिमकी वाजवण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. टिमकी बनवण्यात कारागीर व्यग्र असल्याचं चित्र सध्या शहरात दिसतंय. मात्र यावेळी कारागिरांनी या टिमक्यांवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे अशी राजकीय पक्षांची नावं रेखाटली आहेत.

मतदान करा, रेखाटला संदेश : लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारे कारागीर कला साकारत असून येवल्यातील टिमकी कारागिरांनी होळी सणासाठी विक्रीस बनवलेल्या टिमक्यांवर 'मतदान करा' असा संदेश रेखाटून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. कारागिरांनी योग्य पक्षालाच मतदान करा, असंदेखील आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं असून कोणाची टिमकी यंदा वाजणार व कोणाची वाजणार नाही हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाच्या नावाच्या टिमक्या घेत असून आमचीच टिमकी वाजणार, असा छातीठोक दावा पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहेत.

20 ते 30 टक्क्यांनी भाववाढ : होळीच्या सणाला टिमकी बनवण्याची शेकडो वर्षांची परंपरा असून या टिमकी बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यानं यंदा टिमकीच्या भावात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचं कारागिरांनी सांगितलं. हा सर्व कच्चामाल धुळे इथून मिळत असल्यानं त्याला वाहतूक खर्चही लागतो. दिवसेंदिवस महागाई तसंच यावेळी पाऊसही कमी झाल्यानं अक्षरशः दुष्काळाचा फटका आता टिमकी विक्रेत्यांना देखील जाणवताना दिसत आहे. पूर्वी होळीच्या तीन ते चार महिन्यांआधी टिमकीची विक्री सुरु होत असे. मात्र, सण अगदी एका दिवसावर आला असून देखील ग्राहकांमध्ये खरेदीसाठी उत्साह दिसत नाहीय. आधीच दुष्काळाचं सावट, त्यातच ग्राहकांची अनास्था अशा अडचणींच्या कात्रीत कारागीर अडकले आहेत.


हेही वाचा :

  1. सावधान! होळीत 'हे' काम केल्यास थेट होऊ शकतो तुरुंगवास, काय आहे बीएमसीची नियमावली? - Holi 2024
  2. होळीच्या सणाला रेल्वेची खास सेवा: मध्य रेल्वे चालवणार 112 विशेष ट्रेन

ABOUT THE AUTHOR

...view details