अहमदनगर Fake Disability Certificate :वादग्रस्त माजी परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी अहमदनगर जिल्ह्यातून दोन बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्यानंतर राज्यभरात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचं प्रकरण गाजतंय. असं असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. अहमदनगर येथे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हॅकर्सचा वापर होत असल्याचं समोर आलंय. अहमदनगरातील जिल्हा रुग्णालयात कुठलीही तपासणी न करता शासनाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून तीन जणांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
नेमकं काय आहे प्रकरण? :मिळालेल्या माहितीनुसार, नगरच्या जिल्हा रुग्णालयानं सागर भानुदास केकाण, प्रसाद संजय बडे, सुदर्शन शंकर या तिघांची तपासणी केली नसतानाही त्यांना शासनाच्या 'स्वावलंबन कार्ड' या संकेतस्थळावरून एप्रिल 2024 मध्ये दिव्यांग प्रमाणपत्र मिळालं. तसंच संबंधित व्यक्ती जिल्हा रुग्णालयात तपासणीला आल्यासंदर्भातील कोणतीही नोंद आढळली नाही. रुग्णालयानं तपासणी केल्याशिवाय दिव्यांग प्रमाणपत्र तसंच दिव्यांग व्यक्तीला त्याची ओळख दर्शवणारा युडीआयडी क्रमांक मिळू शकत नाही. परंतु या तिन्ही व्यक्तींना हा क्रमांक मिळाला. अहमदनगरच्या 'सावली' दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांनी तक्रार केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. तर दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासकीय रुग्णालयाच्या संबंधित विभागाकडून तपासणी करून अहवाल शासनाच्या वेबसाईटवर टाकावा लागतो. त्यानंतर वेबसाईटवरून अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळतं. यासाठी वेबसाईटची लॉगिन आयडी आणि पासवर्ड देखील शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडं असते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी या प्रकरणात पोलिसांना लेखी पत्र देणार असल्याची माहिती दिली. सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे म्हणाले, " ऑफलाईननंतर आता ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आढळत आहेत. या प्रकरणाचा सरकारनं सखोल तपास करावा."