कोलकाता : 15 वर्षांपूर्वी 400 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या न्यायालयानं एका डॉक्टरला चार वर्षांचा तुरुंगवास आणि 30,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. डॉ. सुनील कुमार सिंह असं या डॉक्टराचं नाव असून 400 रुपयांची लाच घेताना सीबीआयनं त्यांना रंगेहात पकडलं होतं.
नेमकं काय आहे प्रकरण? : सुनील कुमार सिंह हे ईसीएल सेंट्रल हॉस्पिटलचे डॉक्टर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 2009 मध्ये दुधनाथ यादव हे आपले वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी डॉक्टरांकडं गेले होते. डॉक्टर सुनील सिंह यांनी दुधनाथ यादव यांच्याकडं 400 रुपयांची लाच मागितली. त्यानंतर दुधनाथ यांनी सीबीआयकडं धाव घेतली. त्यानंतर सापळा रचत सीबीआयनं डॉक्टरला लाच घेताना रंगेहात पकडलं.
4 वर्षांचा सश्रम कारावास : किंमत कितीही असली तरी सार्वजनिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून लाच घेणं हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळं याप्रकरणी डॉक्टर सुनील सिंह यांच्यावर खटला सुरू झाला. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली पण खटला सुरूच होता. सीबीआयच्या विशेष न्यायालयानंतर हे प्रकरण आसनसोलमध्ये आलं. हा खटला सुमारे 15 वर्षांपासून सुरू होता. अखेर या प्रकरणी न्यायाधिशांनी डॉ. सुनील सिंह यांना दोषी ठरवून 4 वर्षांचा सश्रम कारावास आणि 30 हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले. दंड न भरल्यास डॉक्टरला आणखी 3 महिने कारावास भोगावा लागू शकतो.
यासंदर्भात अधिक माहिती देत सीबीआयचे वकील राकेश कुमार यांनी सांगितलं की, "दुधनाथ यादव हे वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी आसनसोलच्या कल्ला येथील ईसीएलच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये गेले होते. मात्र, प्रमाणपत्रासाठी सुनील सिंह यांनी दुधनाथ यादव यांच्याकडं 400 रुपयांची मागणी केली. त्यानंतर सुनील सिंहला रंगेहात पकडण्यात आलं." तसंच हा निकाल पाहता भविष्यात संबंधित डॉक्टर मोठ्या न्यायालयात जाऊ शकतात, असंही त्यांनी सूचित केलं.
हेही वाचा -