शिर्डी : शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी तसंच या मूर्तीची झीज रोखण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या तज्ज्ञांनी साई मूर्तीची शुक्रवारी (20 डिसेंबर) तब्बल अडीच तास बारकाईनं पहाणी केली. तर याबाबतचा लेखी अहवाल दीड महिन्यात मिळेल, अशी प्राथमिक माहिती साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिलीय.
पथकानं कोणत्या दिल्या सूचना ? : यासंदर्भात अधिक माहिती देत बाळासाहेब कोळेकर म्हणाले की, "साईबाबांच्या मूर्तीची झीज टाळण्यासाठी तज्ज्ञांनी काही तोंडी सूचना केल्या. मूर्तीच्या स्नानासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करणे, शक्यतो स्पंजींग करणे, स्नानानंतर टॉवेलनं पुसणे, दही-दुधाचा आणि गंधाचा वापर टाळणे, गंधासाठी चंदनाचाच वापर करणे, आदी सूचना करण्यात आल्या. तसंच मूर्तीची झीज झाल्याचंही तज्ञांनी मान्य केलंय. तर याबाबतचा लेखी अहवाल संस्थानला प्राप्त झाल्यानंतर याविषयी साई संस्थान समिती योग्य तो निर्णय घेईल", असंही कोळेकर यांनी सांगितलं.
5 तज्ज्ञांच्या पथकानं केली पाहणी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे तज्ज्ञ एस मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली पाच तज्ज्ञांचं पथक 20 डिसेंबर रोजी सकाळीच शिर्डीत दाखल झालं. सर्वप्रथम या पथकानं द्वारकामाई मंदिराची पाहणी केली. त्यानंतर दुपारी पावणे दोन वाजेच्या दरम्यान साईमंदिर पूर्णपणे बंद करण्यात आलं. मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणाही बंद करण्यात आली. यावेळी मूर्तीच्या बाजूनं पडदे लावून मूर्तीचे मायक्रो इन्स्पेक्शन करण्यात आले. मूर्तीला जिथं काळे डॉट आलेत, त्या ठिकाणची विशिष्ठ पद्धतीच्या कॅमेऱ्यानं फोटोग्राफी करून ते अभ्यासासाठी संगणकात संरक्षित करण्यात आले. मूर्तीला काही इजा झालेली आहे की नाही, याचीही बारकाईनं पाहणी करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी मूर्तीचं पावित्र्य जपण्यासाठी तज्ज्ञांनी सोवळं परिधान केलं.
हेही वाचा -