मुंबई - अल्लू अर्जुनची भूमिका असलेला 'पुष्पा 2' या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींची कमाई केली आहे. 'बाहुबली 2' नंतर, 'पुष्पा 2' हा देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपये कमावणारा दुसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि चित्रपटंने रिलीज होऊन 16 दिवस पूर्ण केले आहेत. आज 21 डिसेंबर रोजी चित्रपटानं रिलीजचा 17 वा दिवस आणि तिसरा वीकेंड गाठला आहे. 'पुष्पा 2' हा चित्रपट तिसऱ्या वीकेंडपासून देशांतर्गत 'बाहुबली 2' चा 1030 कोटीचा विक्रम मोडणार आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'पुष्पा 2' नं 16 व्या दिवशी 13.75 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. 'पुष्पा 2' नं 16व्या दिवशी तेलगूमध्ये 2.4 कोटी, हिंदीमध्ये 11 कोटी, तामिळमध्ये 0.3 कोटी, कर्नाटकमध्ये 0.3 कोटी आणि केरळमध्ये 0.3 कोटी रुपये कमावले आहेत. यासह, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई 1004.85 कोटींवर पोहोचली आहे. दरम्यान, वर्ल्डवाइड 'पुष्पा 2 : द रुल' 1550 कोटींच्या दिशेनं वाटचाल करत आहे. 'पुष्पा 2' हा जगभरातील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे.
'बाहुबली 2' च्या विक्रमाच्या दिशेनं 'पुष्पा 2' ची वाटचाल
एसएस राजामौली यांचा 'बाहुबली : द कन्क्लुजन' हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झाला होता. राजामौली आणि प्रभासच्या 'बाहुबली 2' नं अजूनही भारतात सर्वाधिक कमाईचा विक्रम कायम राखला आहे. 'बाहुबली'नं भारतात 1030 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता आणि जगभरात 1800 कोटी रुपये कमावले होते. 'बाहुबली 2' हा जगात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा भारतीय चित्रपट भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. 'बाहुबली 2' आमिर खानच्या दंगल चित्रपटाच्या 2000 कोटींहून अधिकच्या कमाईच्या मागे आहे. या पार्श्वभूमीवर 'पुष्पा 2' या दोन्ही चित्रपटांचे विक्रम मोडून भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.