महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संतोष देशमुख हत्येप्रकरणी राज्यपालांनी हस्तक्षेप करून मुंडेंचा राजीनामा घ्यावा, सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी - SANTOSH DESHMUKH MURDER CASE

या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केलीय.

Governor should intervene in Santosh Deshmukh murder case
संतोष देशमुख हत्येप्रकरणी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2025, 1:23 PM IST

मुंबई -बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतलीय. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या आणि सुरू असलेल्या खंडणीखोरीच्या कारवायांमुळे बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात राहिलेली नाही, असा आरोप शिष्टमंडळाने केलाय. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केलीय.

या प्रकरणात पक्षपातपणा होत असल्याचा संशय : माजी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटलेल्या या सर्वपक्षीय शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, आ. जितेंद्र आव्हाड, आ. संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे यांचा समावेश होता. या प्रकरणात पक्षपातपणा होत असल्याचा संशय असल्याने आणि आरोपींना राज्य सरकारकडून कथित पाठिंबा मिळत असल्याने नागरिकांचा विश्वास उडालाय, त्यामुळे राज्यपालांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आलीय.

शिष्टमंडळाच्या मागण्या काय? : "कायद्याचे राज्य” ही भावना दृढ होण्यासाठी अपहरण, खंडणी आणि खून प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिकी कराड याच्याविरुद्ध बीएनएस 103 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी सुनिश्चित करून कर्तव्यात कुचराई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. बीडमधील रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करावी आणि खंडणी आणि गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा मागण्या शिष्टमंडळानं केल्यात.

मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज- संभाजीराजे :राज्यपालांना भेटल्यानंतर संभाजीराजे म्हणाले, ही माणुसकीची हत्या आहे. त्यामुळे या प्रकरणात जातीच्या पलिकडे जाऊन देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. मराठा-वंजारी असा वाद करण्याची गरज नाही. आम्ही या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालावे, अशी मागणी केलीय. राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिलंय. पुरोगामी महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी जातीपातीच्या पुढे जाण्याची गरज आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची गरज आहे. यापूर्वी ए. आर. अंतुले, मनोहर जोशी, अशोक चव्हाण, आर. आर. पाटील, अशा विविध नेत्यांनी लोकांचा आक्रोश पाहून राजीनामा दिला होता. आता धनंजय मुंडेंना सरकार, अजित पवार का संरक्षण देत आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारलाय.

मराठा-वंजारी हा वाद करू नये- आव्हाड :आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बीडमध्ये यापूर्वी झालेल्या प्रकरणांचा तपास होण्याची गरज व्यक्त केलीय. मराठा वंजारी हा वाद करू नये. सरकारने मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करू नये, असे आव्हाड म्हणालेत. चौकशी अधिकाऱ्यांचे आरोपींसोबत संबंध आहेत. त्यांचे इंटरेस्ट आहेत, त्यामुळे या प्रकरणातील चौकशी अधिकारी तत्काळ बदलावेत, अशी मागणी अंबादास दानवेंनी केलीय. राज्यपालांना भेटल्याने या प्रकरणात न्याय मिळेल, अशी आशा दानवे यांनी व्यक्त केलीय.

हेही वाचा -

  1. "बीडमधील प्रकरणात सरकारमधील मंत्र्यांकडून प्रोत्साहन...", पृथ्वीराज चव्हाण यांचा महायुतीवर निशाणा
  2. संतोष देशमुख हत्याकांड : सुरेश धस यांचा मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाले, 'आका वापरायचा 17 मोबाईल फोन'

ABOUT THE AUTHOR

...view details